'सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट' च्या प्रयोगशाळांनी, बाटलीबंद पाणी व पेयांमधील कीटकनाशकांच्या मात्रांचे प्रमाण जादा असण्याचा अहवाल देशासमोर मांडला. हा अहवाल म्हणजे भारतीय नागरिकांसाठी धोक्याची सूचना आहे. ही बाटलीबंद शीतपेये विषयुक्त आहेतच, पण त्यांमध्ये कोणती पौष्टिकताही नाही. या पेयांपासून आपल्या शरीरास, मनास कोणतेही बळ प्राप्त होत नाही. ही केवळ चैनीची किंवा वाह्यात प्रतिष्ठेची पेये आहेत. आपण या पेयांचा त्याग केला पाहिजे.
सन १९९९मध्ये ए.आय. सी. आर. पी. ने देशभरातील अन्नधान्याचे नमुने गोळा करून ते तपासले. त्यामध्ये कीटकनाशकांचे अंश, मान्यता पातळीपेक्षा १४% हून जास्त असल्याचे आढळले. तामिळनाडू, उत्तरप्रदेश, केरळ, मध्यप्रदेश येथील भाजी मार्केटमधील अनेक भाज्यांमध्ये, मान्यता पातळीपेक्षा कीटकनाशके जादा आढळली. भाज्याचे नमुने १०पासून ते १००% टक्के इतके विषयुक्त आढळले.
आज संपूर्ण जगासमोर पौष्टिक व सुरक्षित अन्न हा गंभीर प्रश्न उभा आहे. मनुष्य प्राण्यामध्ये कोणत्याही आजाराचा किंवा रोगाचा शिरकाव हा मुख्यत्वे हवा, पाणी आणि अन्न या तीन मार्गानी होतो. वाहनांची वाढती संख्या, कारखान्यांतून बाहेर पडणारे धुराचे लोट व वाढते धुळीचे कण यांमुळे हवा प्रदूषित होत आहे. याला आपण जबाबदार आहोत. शहरांतील व कारखान्यांमधील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय नद्यांमधून वाहात आहे; जमिनीत मुरत आहे. तसेच रासायनिक शेतीपद्धतीमुळे शेतकरी नत्र, स्फुरद व पालाश यांचा रासायनिक खतांच्या रूपांत अतिरेकी वापर करीत आहेत. या कारणामुळे आज पाणीही प्रदूषित बनले आहे. अन्नाच्या प्रदूषणास तर केवळ रासायनिक शेतीपद्धतीच जबाबदार आहे. शेतामध्ये पिकांवर कीड दिसताच रसायनांचा (कीटकनाशकांचा) मारा शेतकरी करतो. ही कीटकनाशके अन्नामधून, फळांमधून, भाज्यांमधून आपल्या आहारात येत आहेत. भाज्या फळे कितीही धुतली तरी वनस्पतींच्या पेशींमध्ये शिरलेली आंतप्रवाही औषधे थेट आपल्या असतात. त्यामुळे आज अन्नही सुरक्षित नाही.
स्वातंत्र्यानंतर आपण देशामध्ये अधिक अन्न उत्पादन व्हावे म्हणून हरितक्रांतीच्या नावाखाली संकरित बियाणे, व त्या बियाणांना हवीत म्हणून रासायनिक खते शेतीमध्ये वापरायला सुरुवात केली. रासायनिक खते देताना पारंपरिक शेणखत, सोनखत, कचऱ्याचे खत या सर्व गोष्टी हळूहळू आपण विसरत गेलो. एक-पीक पद्धती अवलंबून पूर्वीची निराळी सहयोगी पिके लावणे, जमीन सेंद्रिय खतावर सुरक्षित ठेवणे, शेताभोवती रक्षक वनस्पतींची जिवंत कुंपणे तयार करणे, या गोष्टी पडद्याआड गेल्या आहेत. रासायनिक खतातील नत्र, स्फुरद, पालाश यांच्या मात्रांनी वनस्पतींमध्ये असमतोल निर्माण होत गेला व कीटकनाशके वापरण्याची वेळ आली. वनस्पतींच्या जीवनचक्रामध्ये किडी-बुरशी प्रतिकार करण्याची सोय निसर्गान केली आहे. जेव्हा किडी येतात त्याचवेळी त्यांचे भक्षकही येतात व किडींना नियंत्रणात ठेवतात. हा नैसर्गिक सिद्धांत दृष्टीआड झाला. आज बाजारातून मिळणारे सर्व अन्न कोणत्या ना कोणत्या कीटकनाशकाच्या संपर्कात आलेलेच असते.
या विषारी अन्नाचा दुष्परिणाम आता समाजामध्ये सर्वदूर दिसत आहे. निरनिराळ्या आजारांनी, व्याधींनी ग्रस्त माणसे दिसतात. त्यांची गरज म्हणून एकीकडे दवाखाने व औषधांची दुकाने प्रचंड प्रमाणात वाढताना दिसतात. विषारी व निकृष्ट अन्न खाण्यामुळे माणसांची रोगप्रतिकारक शक्ती नष्ट होत चालली आहे. विषारी अन्नामुळे त्वचारोग, वंध्यत्व, कर्करोग, चेतासंस्थांचे रोग, रक्तदाब, मधुमेह यांचे प्रमाण फारच वाढताना दिसत आहे. रासायनिक शेतीमधील अन्न पौष्टिकही नसते; त्यामुळे हाडांचे विकार, संधीवात यांसारखे रोगही दिसत आहेत.
यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेतीपद्धतीतील विषरहित व रसायनरहित सेंद्रिय अन्न, फळे, भाजीपाला आपल्या आहारात आणणे. विषरहित अन्न हवे; त्याबरोबरच ते पौष्टिकही हवे. 'जर्नल फॉर अप्लाईड न्यूट्रिशन' या मासिकामध्ये सेंद्रिय शेती पद्धतीच्या कडधान्यात असलेल्या सूक्ष्म द्रवांचा तुलनात्मक अभ्यास आलेला आहे. त्याप्रमाणे सेंद्रिय अन्नात ६३% जादा कॅल्शियम, ७८% जादा क्रोमियम, ७३% जादा लोह, ११८% ज्यादा मॅग्नेशियम, १७८% जादा मॉलीब्लेनम, २१% ज्यादा
फॉस्फरस, १२५% जादा पोटॅशियम आणि ६०% ज्यादा झिंक असते.
सेंद्रिय वाटाण्यामध्ये प्रोटीन १.३४, कार्बोहाइड्रेट ६.१ तर लिपिड २ आढळले; तर रासायनिक शेतीपद्धतीच्या उत्पादनात प्रोटीन १.१०, कार्बोहायड्रेट ५.७ आणि लिपिड १.२ एवढीच आढळली. अमेरिकेतील कम्फोलेन संशोधन केंद्रातील अभ्यासात सेंद्रिय सफरचंदात विटामिन सी २१.१ मि.ग्रॅ./१०० ग्राम, तर रासायनिक सफरचंदामध्ये १९.३ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम आढळते. सेंद्रिय टोमॅटोमध्ये विटामिन सी २.९ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम, तर विटामिन ए ४.९ मि.ग्रॅ./१०० ग्राम आढळले. रासायनिक टोमॅटोमध्ये तेच अनुक्रमे १.८१ मि.ग्रॅ., व ३.५ मि.ग्रॅ. आढळले. ही सर्व सूक्ष्म द्रव्ये आरोग्याशी अत्यंत निगडित आहेत. अधिक उत्पादन घेताना पौष्टिकतेचा ऱ्हास ही चुकीची कल्पना आहे. यातून आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
सर्व समाजाचे आरोग्य चांगले राखायचे तर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. विषरहित पौष्टिक अन्न समाजाला देणारा, सेंद्रिय शेती करणारा शेतकरीच खरा अन्नदाता ठरेल. आज आपल्या देशात हजारोंच्या संख्येने शेतकरी या पद्धतीकडे वळले आहेत व आपल्या जमिनीची, पर्यावरणाची, व अन्नाद्वारे समाजाची काळजी घेण्याचे काम करीत आहेत. ग्राहकांनी जागरूक होऊन आपल्या दैनंदिन आहारामध्ये जास्तीत जास्त भाग सेंद्रिय शेतीपद्धतीतून अन्न मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाटलीबंद शीतपेयांमध्येही मोठ्या प्रमाणात कीडनाशकांचे अंश आढळत आहेत. शासकीय प्रयोगशाळांतून यांचे पृथःकरण होऊन यावरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु आपल्या उत्तम आरोग्यासाठी शीतपेये पूर्णतः टाळणे हाच शाश्वत उपाय आहे. आपले आरोग्यही सुरक्षित राखले पाहिजे. आपला आहार जर शुद्ध असेल तरच आपले आचार, विचार, व्यवहारही शुद्ध होतील व त्यातून एका सुदृढ समाजाची निर्मिती होईल.