भोगी नव्हे (कर्म) योगी

भोगी नव्हे (कर्म) योगी

प्रख्यात रशियन तत्वचिंतक आणि लेखक काउंट लिओ टॉल्स्टॉय याची एक उद्बोधक कथा आहे. एका माणसाला त्याच्या भयंकर हव्यासातून, आपल्याकडे भरपूर जमीन असायला हवी अशी वखवख सुटली होती. त्याने परमेश्वराची आराधना केली, परमेश्वर प्रकटला. त्याला म्हणाला, 'उद्या सूर्योदयाला तू चालायला सुरुवात कर. सूर्य मावळेपर्यंत जेवढे अंतर काटशील, तेवढी जमीन तुझी! परंतु एक अट आहे. तू जिथून प्रारंभ करणार आहेस तिथं तू परत येऊन भिडायचं. जेवढ्या जमिनीला वेढा मारशील तितकी जमीन तुझी.' त्या माणसाला आनंद झाला. आपण किती चालू, किती धावू शकू, कुठंपर्यंत जाता येईल असे आडाखे बांधण्यात त्याची रात्र सरली. सूर्योदय झाला. याने भरभर चालायला... हळूहळू धावायलाच सुरुवात केली. सूर्य चढत चालला. घामाच्या धारा लागल्या. बरेच अंतर तुटले. दुपार झाली. याला तर जेवणाचीही शुद्ध राहिली नाही. जेवायला थांबलो तर तितकी जमीन कमी मिळेल ना! उन्हे कलली. याला आठवले की, जितके अंतर आलो तितकेच परतीला तोडायचे आहे, तर मूळस्थानी पोचणार. दिशा फिरवली. आता त्याच्याच लांबलेल्या सावलीच्या मागे तो धावधाव धावत निघाला. थकत गेला. फेस निघाला. लडबडू लटपटू 

लागला. सूर्य क्षितिजाकडे निघालेला, तसा हा जिवाच्या आकांताने बळ करून धावू लागला. शेवटी काय ? अंतिम आनंदाचा टप्पा गाठण्याआधीच बिचारा रक्त ओकून पडला, गतप्राण झाला. आजूबाजूची माणसे जमली, त्याला तिथेच दफन केले. टॉल्स्टॉय शेवटचे वाक्य लिहितो, 'त्या बिचाऱ्याला हे ठाऊक नव्हते की त्याला केवळ साडेतीन हात जमीन पुरेशी होती.' 

आपण त्या माणसासारखे नाही, असे आपण छातीठोकपणे म्हणू शकतो का? आपली हाव, आपली धाव कशासाठी आणि किती असते याचा आपणच मनाशी शोध घेतला तर वेगळे काही दिसेल का? 

याउलट आणखी एक कथा. एक माणूस भर उन्हाचा प्रवासाला निघाला होता. गावाच्या बाहेर बसची वाट पाहात तो जिथे थांबला होता, तिथे जवळ एका छोट्या झाडाच्या दाटक्या सावलीत दुसरा एक गाववाला निवांत झोपला होता. बस लवकर येत नव्हती. प्रवाशाला या निवांत माणसाचा हेवाच वाटत होता. थोड्या वेळाने त्या गृहस्थाला जाग आली. त्याने आळोखेपिळोखे दिले. जवळ कुणीच नव्हते म्हणून या प्रवाशाने चौकशी केली, जरा ओळख वाढवली. विचारले, 'काय करता?' 

'काय न्हाई, इथं थोडी जमीन आहे. पेरतो. पिकंल ते खातो.' 

'मग असं झोपून कसं चालेल? जास्तीचं काम करावं. कर्ज मिळतं, ते घ्यावं. आणखी जमीन लागवड करावी. बाजार शोधावा. जास्त पैसा मिळेल...' 

'मग? त्यानं काय होईल?' याची शंका. 

'घर बांधशील, गाडी घेशील...' 

'त्यानं काय साधंल?' 

'असं काय म्हणतोस? तुला खूप पैसा मिळेल' हा प्रवासी समजूत काढू लागला.


'त्या पैशाचं काय करावं?' याचीही शंका संपेना. 

'अरे, पैशानं तुला सुख मिळेल. सुखाची निवांत झोप लागेल...!' प्रवासी पाव्हण्याचं ठाम उत्तर. 

'मग आत्ता लागली होतीच की....!' पाव्हणा निरुत्तरच ! 

आपण या स्वस्थ माणसासारखे आहोत काय? काहीही प्रयत्न न करता काळ कंठणारे आपणच कुणीतरी आहोत की  आपल्याला पैसा आणि साऱ्या सुखसोयी मात्र हव्या असतात. त्यासाठी आपल्या मर्यादा जाणून कठोर प्रयत्न करणे हा पुरुषार्थ असतो. अमर्याद हव्यास मनात धरून धावत सुटणे आणि चिरगुटांत लोळत 'निष्काम' काळ कंठणे हे दोन्ही गैर आहे. जे श्रमाने मिळते, त्याचा आनंद घेता यायला हवा. आपल्या संस्कृतीने उपभोगावर संयम शिकविला, त्याचप्रमाणे आस्वादाची प्रेरणाही सांगितली. 

आपल्या घरी चांगले अन्न शिजले, पण जेवायला वेळ नाही. घरात टीव्ही आणला, पण पाहायला वेळ नाही. नवे कपडे शिवले पण ते परिधान करण्याची वेळच साधत नाही. रात्रीची झोप नाही, कारण उद्याच्या सूर्योदयाबरोबर धावायला लागायचे आहे. जे पैशाच्या मागे धावतात त्यांची ही कथा. आणि ज्यांना कामाची पैशाची कशाचीच फिकिर नाही अशा आळशी लोकांची ती कथा! त्यांच्याकडे पैसा नाही, काम नाही. जनावरं निदान कुठंतरी जाऊन चरतात, या दरिद्रीनारायणांनी काय करायचे? झोप येती म्हणून झोपायचे? जग आज या दोन गटांत विभागले आहे. एका गटाकडे पैशाची हव्यासी ओढ आहे; आणि दुसऱ्या गटाकडं पैसाच नाही. 


पैशामागे धावणाऱ्यांचे जीवनही धावते बनले आहे. मूल अमूकच शाळेत गेले पाहिजे; त्याने अमूकच कोर्स केला पाहिजे; त्याने शालांत परीक्षेला बोर्डात आले पाहिजे; आपल्या नहाणीघरात चकचकीत टाईल्स हव्यातच; गाडी तर अनिवार्यच.... ! असल्या महत्वाकाक्षांपोटी सारे घर धावायला लागते. सूर्य कलू लागल्यावर धावण्याची गती वाढते. आपल्याच सावलीमागे धावताना दमछाक होते. काहीतरी चुकते. मुलाला मार्क कमी पडतात, मुलीचे लग्न अडखळते, मनाला निराशा येते, मन कचरायला लागते. आमच्या शेतीक्षेत्रातही तशी वेळ येऊ पाहात आहे. फोंड्या माळावर नंदनवन फुलवायचे असते. काश्मीरची सफरचंदे सोलापूर-कोल्हापूरला पिकवायची असतात. आपली जमीन कोणती आहे, कशी आहे, पाणी किती आहे, भांडवलाचे काय, बाजारपेठ आहे का, 

मनुष्यबळ किती, हवामान अनुकूल आहे का... कशाचा विचार न करता प्रचंड पैसा ओतण्यासाठी कर्जाचे डोंगर अंगावर घ्यायचे, यशाची खात्री हरवू लागली की झोप उडते. भरमसाठ प्रयत्नांतून उत्पादन मिळालेच तर शेवटी शहरातील बाजारात बसलेला दलाल किंवा निर्यातदार त्याच्या गादीवर बसून शेतकऱ्याच्या इच्छा-आकांक्षांना चूड लावणार!! 

प्रत्येक क्षेत्रात काम करताना जरा शांत-समंजस विचार केला पाहिजे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपली लोकसंख्या ३५-४० कोटि होती, आज १३० कोटि आहे. इतक्यांना अन्नधान्य पुरविलेच पाहिजे म्हणून वाटेल त्या उपायांनी उत्पादन वाढविण्याची धूम उसळली. हरित क्रांतीचे नारे देत आपण रासायनिक खते, बियाणी, कीडनाशके यांचा महापूर आणला. 'हरी हरी ये वसुंधरा। नीला नीला ये गगन।' आपल्याला कुठे दिसेनासे झाले. सारे वातावरण बिघडले. झाडे, ओला चारा, कित्येक सजीव प्रजाती, नदीतील पाणी नाहीसे झाले. मोकळा श्वास मिळेना, कार्बन वाढल्यामुळे जीव गुसमटले, आजार फोफावले. हे निराशामय विचार मांडत राहिलो तर मग कुणी म्हणेल, 'तर मग माणसाने कशाचा उपभोग घ्यायचाच नाही काय?' 


सृष्टीचा आणि आपल्या कर्तबगारीचा, संशोधनाचा, यशाचा आस्वाद जरूर घ्यायचा, उपभोगही घ्यावा... परंतु केवळ भोग घ्यायचा नाही. मधमाशी फुलातला मध काढून घेते; मध तिला मिळतो पण फुलाला इजा होत नाही. उलट परागीभवनातून बाकीची फुले फुलण्यासाठी त्याच मधमाशीचा उपयोग फुलांना होतो. मधमाशी जर त्या दुसऱ्या आळशी माणसाप्रमाणे बिनकामाची निवांत झोपून राहिली तर तिला मध मिळणार नाही, आणि फुलेही फुलणार नाहीत. फळ धरणार नाही, बी तयार होणार नाही. म्हणून आपल्या संस्कृतीत 'अर्थशास्त्र' या शब्दाऐवजी 'अर्थनीती' हा शब्द वापरलेला आहे. पैसा मिळविताना तो नैतिक पायावर, साऱ्यांच्या हितासाठी मिळवायला हवा. आपल्या अर्थनीतीने 'उत्पादनात वाढ, वितरणात समानता आणि उपभोगावर संयम' हा प्रगतीचा मंत्र सांगितला आहे. केवळ भोगवादी वृत्तीमुळे अकारण स्पर्धा वाढतात, जीवनाचा तो मार्ग एका कड्यापर्यंत पोचतो. हा विकास नव्हे. यातून सुख मिळत नाही. सुख म्हणजे सुखोपभोग भागिले सुखेच्छा. सुखेच्छा-छेद वाढला की भागाकाराचे उत्तर शून्याच्या जवळ जाते. इच्छा कमी झाल्या तर सुख वाढते. आपल्याला शेतीतून आणि आपल्या जीवनमार्गीतून सुखाकडे जायचे आहे. 


 

Back to blog