सूर्ये अधिष्ठिली प्राची। जगा राणीव दे प्रकाशाची। तैसी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी॥

सूर्ये अधिष्ठिली प्राची। जगा राणीव दे प्रकाशाची। तैसी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी॥

सूर्य प्राचीला अधिष्ठित झाला (पूर्वेला उगवला) की जगाला प्रकाशाचे राज्य (राणीव प्रकाशाची) देत असतो. तशी वाणी (किंवा आजच्या काळातील हा लेखनप्रपंच) श्रोत्यांसाठी (आमच्या वाचकांसाठी) ज्ञानाची दिवाळी करेल.         
ज्ञानेश्वरांच्या ओवीचा, आपल्या दृष्टीने अन्वय लावून केलेले हे भाष्य सेंद्रिय विचार या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. दीप लावून दिवाळी करण्यापेक्षाही ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरविणे ही खरी दिवाळी! ती केवळ एका सणापुरती मर्यादित न ठेवता चिरंतन साजरी करत जावी. असाच उद्देश ठेवून आमचे प्रयत्न चालू आहेत.       
दिवाळीचा सण आपल्या देशात मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. पावसाळा संपून गेलेला असतो, शरद ऋतूची सुरुवात असते. शारदीय नवरात्र उलटून दसऱ्याचे सोने लुटल्यानंतर, दिव्यांचा उत्सव आपण सर्वत्र साजरा करतो. शेतकऱ्यांना सुगीची चाहूल लागते. त्याचबरोबर घराची आणि परिसराची स्वच्छता हाही या सणाचा एक महत्त्वाचा भाग असतो. पावसाळ्यात वातावरण कुंद-कुबट झालेले असते. घरातील अंथरुणेसुद्धा पावसाळी हवेत धुता-वाळवता येत नाहीत.  ती महाळाच्या महिन्यात (पक्ष पंधरवड्यात) ओढ्या नद्यांवर धुवून वाळवून आणली जातात. त्या हवेला कीड डास यांचा प्रादुर्भाव होतो, तो नाहीसा करून स्वच्छ सूर्यप्रकाशात आपली वस्त्रप्रावरणे, अंगणओटे हे झाडून पुसून सारवून लख्ख करायची असतात. तेथे दिव्यांची आरास मांडायची असते. हवेत गारवा जाणवू लागतो, त्यामुळे मिठाई आणि स्निग्ध पदार्थ सेवन करणे आरोग्यदायी ठरते. दिवस लहान झालेला असतो, रात्र मोठी होते. धुरळा कमी असतो, आकाश स्वच्छ असते, म्हणून दिव्यांचा प्रकाश लखलखतो.  माणसाच्या आणि सजीव सृष्टीच्या मनात दाटलेली नकारात्मकता कमी होऊन, तिथे पावित्र्य मांगल्य यांचा प्रकाश पसरतो.  विजेच्या माळांऐवजी तुपातेलाचे दीप लावणे जास्त सुसंगत असते. बळीराजाचे राज्य हे आपल्या देशावर सदैव नांदत असते. बळीराजा दानशूर आणि क्षमाशील म्हणूनच प्रसिद्ध होता.         
दिवाळीचाच आणखी एक भाग म्हणजे अभ्यंगस्नान. अभ्यंग याचा अर्थ तैलमाखन करून नंतर गरम पाण्याने सुस्नान करणे. थोडक्यात म्हणजे अंगभर तेल व्यवस्थित चोपडून, ते शरीरात जिरवून, त्यानंतर शरीराला शेक लागेल इतपत गरम पाण्याने अंघोळ करणे. अर्थात त्याकरिता पहाटेची थंड वेळ हवी. त्यामुळे त्वचेला तुकतुकीतपणा येतो. अंगात तेल जिरल्यामुळे हाडे आणि नसा अधिक कार्यान्वित होतात. त्या संपूर्ण महिन्यात अशाच प्रकारे स्नान करणे हितकर असते. यासाठीच अभ्यंगस्नान हे आपल्याकडे महत्त्वाचे मानले आहे.        
आपल्याकडच्या या परंपरा आपण बाजूला फेकून दिल्या आणि कुठली तरी औषधे आणि सौंदर्यप्रसाधने आपण कवटाळून बसू लागलो. आपला देश शेतीप्रधान आहे आणि पश्चिम राष्ट्रे व्यापारप्रधान आहेत. जो माल ते उत्पादन करतात तो खपविण्याचा उद्योग केला तरच त्यांचे व्यवहार चालतात. आपण जमिनीतून सोने पिकवतो आणि साऱ्या सृष्टीला खाऊपिऊ घालण्याची जबाबदारी मानतो, ते कर्तव्य मानतो. ते लोक इथे येऊन हक्क व अधिकार सांगतात. युरोप अमेरिकेतील देश कारखानदारी वस्तूंचे उत्पादन आणि व्यापार (मार्केटिंग) यावर गडगंज पैसा मिळवतात आणि आपल्याला शहाणपणा शिकवितात. दुःख एवढेच वाटते की, हा त्यांचा कावा आपण समजून न घेता, ते सांगतील ते मान्य करून आपल्या चांगल्या परंपरा नाहीशा करू लागलो.        
त्यांच्या या व्यापारी चाली आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. खोबरेल तेल हे अंगाला चोपडणे, डोक्याला लावणे, आणि स्वयंपाकासाठीसुद्धा वापरणे हा आपल्याकडील साधा व्यवहार होता. नुकतीच एक माहिती प्रकाशित झाली ती अशी की, अमेरिकेतील डॉ.ब्रूस यांनी सखोल संशोधन करून एक पुस्तक लिहिले. त्याचे नाव कोकोनट ऑइल मिरॅकल - (खोबरेल तेलाचा चमत्कार). अमेरिकेत पॉल सोअर्स या नावाचा माणूस  मिरॅकल ऑइल या नावाने तेलाच्या बाटल्या विकायचा. लोक हे तेल घेऊन जायचे, अंगाचा एखादा भाग - स्नायू दुखत असेल तर त्यावर हे तेल लावून चोळायचे. हे तेल म्हणजे शुद्ध खोबरेल तेल होते. डॉक्टर ब्रूसला त्याविषयी कुतुहूल वाटले आणि त्याने त्याचा प्रयोग सुरू केला. रोज चमचाभर  तेल तो प्यायचाही. कुठे खरचटले, जखम झाली तर ते तेल लावायचा. दररोज मसाज करायचा. त्याला त्याचे आश्चर्यकारक परिणाम दिसू लागले. त्याने त्यामागील रहस्य शोधायचे ठरवले. जगात जेव्हा सोयाबीनचे उत्पादन वाढले तेव्हा ते खपवण्यासाठी खोबरेल तेलाबद्दल अपप्रचार हेतूपूर्वक सुरू झाला. खोबरेल तेलाच्या वापरामुळे काही आजार होतात अशी भीती घातली. आपल्यासारखे अडाणी ग्राहक घाबरून तसल्या प्रचाराला बळी पडले. खोबरेल तेलाचा वापर बंद करून किंवा कमी करून, सोयाबीनचे तेल वापरायला सुरू केले. तो डॉ. ब्रूस काही देशांत जाऊन आला. तेव्हा मिडीयम चेन फॅटी ऍसिड नारळात असतात, ती शरीराला हितकारक असतात हे त्याच्या लक्षात आले. थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका आणि भारत या पौर्वात्य देशांत खोबरेल तेल मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या देशांत हृदयरोगांचे प्रमाण जगातल्यापेक्षा कमी आहे.   

  
आपल्याकडे तर पूर्वीपासून खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होता. विशेषतः भारताच्या किनारपट्टीचे लोक आजही स्वयंपाकासाठी खोबरेल तेल वापरतात. कोकणात नारळापासून बनवलेले अनेक पदार्थ आहारात असतात. ओल्या नारळाच्या करंज्या, उकडीचे मोदक, देव दिवाळीला करतात ती गूळ खोबऱ्याची खीर (रस), ओल्या नारळाची चटणी केली जाते. कोणत्याही पदार्थात ओल्या खोबऱ्याची विखरणी हे आपल्या आहाराचे वैशिष्ट्य होते. दक्षिण भारतातील महिलांचे केस लांब आणि काळेभोर असतात हे सर्वांना माहीत आहे, त्याचे कारण त्यांच्याकडे खोबरेल तेलाचा वापर जास्त होतो. परंतु आपल्याकडे एखादी गोष्ट पाश्चात्य लोक सांगतात तेव्हा त्याचे महत्त्व लगेच पटते. आधीच्या पिढीचे लोक खोबरेल तेल दररोज एखादा चमचा पीत असत. अंगाला तेल लावून मसाज करत. खेळाडू किंवा व्यायामपटू आठवड्यातून एकदा खोबरेल तेल चोपडून मसाज करताना दिसत. त्यानंतर सूर्यप्रकाशात उभे राहून सूर्यस्नान करत असत. अशा लोकांची कांती तुकतुकीत दिसायची.    

   
त्याच प्रकारे शेंगदाण्याचे तेलही आपण बदनाम केले आहे. लोकांच्या आहारात शेंगदाण्याचे तेल सरसकट होते. घाण्यावर निघणारे हे तेल आरोग्यदायी होते. पण  ते आरोग्याला घातक असा प्रचार जाणीवपूर्वक होत गेला. सोयाबीनचे रिफाइंड तेल खपवण्यासाठी आपले शेंगदाण्याचे तेल मागे पडले. रिफाइंड तेल तयार होताना त्यातील जीवनसत्वे नष्ट होतात. हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि कॉस्टिक सोडा रिफाइंड तेल करण्यासाठी वापरतात. ते तर शरीराला अपायकारकच आहेत. नष्ट  झालेली जीवनसत्वे वरून कृत्रिम रीतीने मिसळली जातात. छान छान दिसणाऱ्या महिला स्वयंपाक करताना आपल्याला जाहिरातीत दाखवतात आणि त्या म्हणतात की डॉक्टरांनी शिफारस केलेले अमुकतमुक तेल वापरा! विज्ञानाची प्रगती होते त्यावेळी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी त्याची मदत झाली पाहिजे. त्याऐवजी असल्या संशोधनांचा  धंदा  होतो आणि आपल्या आरोग्याचे आणि पोषणाचे बारा वाजतात! त्यासाठी पुन्हा फिल्टर तेल वापरा, ते पौष्टिक असते असे सांगायला ते लोक मोकळे!!       
साखर हाही आरोग्यासाठी असाच अपायकारक पदार्थ आहे. साखरेचा वापर पूर्णतः बंद केला तर आरोग्यविषयक बरेच त्रास आपोआपच कमी होतील. आपल्याकडे सरसकट होणारा गुळाचा वापर कमी करून आपण साखरेच्या नादी लागलो. घरातल्या लक्ष्मीचा अव्हेर करून बाहेरच्या बाजाराचा नाद करावा, तसाच हा प्रकार घडला!  साखर तयार होताना फॉर्माल्डिहाईड वापरले जाते. शिवाय फॉस्फरिक ऍसिड, मोनो कॅल्शियम फॉस्फेट, मरीन ब्ल्यू इत्यादी रासायनिक पदार्थ वापरले जातात. ते नष्ट होत नाहीत, तर शरीरात जाऊन आजार निर्माण करतात. त्याचप्रमाणे बेकरी उत्पादने, वनस्पती तूप, मैद्याची बिस्किटे, रस्त्यावरील टपरी-गाड्यातून तळणीसाठी तेचतेच वापरलेले तेल....  या सर्व गोष्टी आपण सरसकट शरीरात घेत असतो आणि नसती आजारपणे ओढवून घेत असतो.        
आपल्या शेतामाळावरची बोरे जांभळे सीताफळे खाऊन पोरेटोरे टुणटुणीत राहात असत. पण आता बोरांऐवजी, परप्रांतांमधून सफरचंदे खेडोपाडी आली. ती तुकतुकीत दिसण्यासाठी त्यावर प्रक्रिया करतात. आंबटगोड बोरे चवीला चांगली; पण ही पिठूळ सफरचंदे आरोग्याला चांगली म्हणून, वाटेल त्या दराने विकली जातात. हे आपण कधी समजून घेणार? 
भारताच्या प्राचीन परंपरेने दिलेले योगशास्त्र म्हणजे, बालवयापासून वृद्धत्वापर्यंत सर्वांसाठी असलेला आरोग्याचा ठेवा आहे. योग म्हणजे जोडणे - जुळविणे.  आपले शरीर, मन व बुद्धी सृष्टीच्या निसर्गचक्राशी जोडणे म्हणजे योग.  आसने, प्राणायाम, दीर्घ श्वसन, भस्रिका इत्यादी क्रियांनी निसर्गसाधना करतात. योगशास्त्राचा प्रसार आता जगभर होऊ लागला. लोक त्याचा स्वीकार करू लागले. ते पाहून काही विदेशी कंपन्यांनी त्याचाही बाजार सुरू केला आहे. मार्केटमध्ये योगाचाही धंदा सुरू झालेला दिसतो. आता तर  ‘बिअर योगा ` दिसू लागला आहे. पुढच्या पिढ्यांसमोर भारतीय योग कोणत्या आणि काय स्वरूपात येणार अशी चिंता करण्याची वेळ आली.  
ही सर्व किल्मिषे आणि जळमटे स्वच्छ करणे हाही दिवाळीच्या प्रकाशाचा आणि शुद्धतेचा एक भाग झाला पाहिजे. आपले तितके चांगले होते हे खरे असले तरी, ते वैज्ञानिक दृष्टीने सिद्ध केले पाहिजे. आपण कमी आहोत आणि पश्चिमी देश खूप प्रगतिशील आहेत - असा एक भ्रम आपण विनाकारण बाळगला आहे. तो काढून टाकावा. हे केवळ सरकारचे किंवा राज्यकर्त्यांचे काम नाही. मनातला तो न्यूनगंड आपणही लवकरात लवकर काढला पाहिजे.      
त्यासंबंधी घडलेला एक प्रसंग उल्लेख करण्याजोगा आहे. संयुक्त राष्ट्र संघ (युनो)च्या जागतिक मानवी अधिकार परिषदेची एक बैठक जिनिव्हा येथे नुकतीच (20 सप्टेंबर 25)  पार पडली. तिथे स्वित्झर्लंडचा प्रतिनिधी होता. त्याने त्याच्या देशाकडून निवेदन करताना असे म्हटले की,  “आमचा देश पृथ्वीवरील स्वर्ग आहे आणि तिथे सर्व लोक आनंदी आणि समाधानी आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. पण भारतामध्ये काही अल्पसंख्य लोकांवर अन्याय होतो. तिथे लोकांना आपली मते मांडता येत नाहीत, त्यांना व्यक्त होता येत नाही, हे योग्य नाही. हा मानवाधिकाराचा भंग ठरू शकतो. त्याबाबतीत भारताने सुधारणा करावी. त्यासाठी आमचा देश मदत करायला तयार आहे.”  हे त्या प्रतिनिधीचे निवेदन ऐकल्यावर आपल्याही हाताच्या मुठी आपोआप वळतील. आजपर्यंत असली निवेदने आपण मुकाटपणे ऐकून घेत होतो, आणि आपल्याकडे खरोखरच असे वातावरण आहे की काय अशी समजूत करून घेत होतो. याउलट  भारताचा त्या परिषदेतील प्रतिनिधी श्री.क्षितिज त्यागी यांनी तिथल्या तिथे खडसावून सांगितले की, “भारत हा बौद्धिक, वैज्ञानिक, नैसर्गिक दृष्टीने संपन्न देश आहे. भारताविषयी अभ्यास न करता, वास्तव न पाहता या परिषदेचा वेळ वाया का दवडता?  वस्तुस्थिती तशी नाही हे लक्षात घ्यावे.  भारतात काश्मीरच नव्हे तर कोणत्याही खेड्यात जा;  तिथे तुम्हाला निसर्गाची विविध रूपे दिसतील आणि लोक आनंदाने नांदत असलेले पाहायला मिळेल.”        
आजपर्यंत विदेशांची ती फुशारकी ठीक होती, पण बदलता भारत कसा आहे याची तिकडच्या जगाला कल्पना नसावी.  हे तडफदार उद्गार आपण आता काढू शकतो. आपल्या परंपरागत ज्ञानाच्या प्रकाशाने आसमंत उजळून टाकण्यासाठी लोकांनी आपली शक्ती-बुद्धी उपयोगात आणली पाहिजे. वास्तव असे आहे की, स्वित्झर्लंडची लोकसंख्या जेमतेम 90 लाख, आपली 145 कोटी; - म्हणजे त्या देशाच्या दीडशेपट आहे. तिथे चार मुख्य धर्म आहेत, आपल्या इथे त्यांची संख्या 10. -  शिवाय सुमारे सात हजार जाती-उपजाती आहेत. त्यांच्याकडे चार भाषा बोलल्या जातात इथे 1700 भाषा बोलल्या जातात. त्या देशाचा विस्तार जेवढा आहे, तेवढे तर आपले एक एक राज्य आहे. एवढी विस्तीर्ण ताकद आपली असून, त्यांनी आम्हाला मानवाचे अधिकार शिकवावेत अशी परिस्थिती नाही.       
ही माहिती आणि हे ज्ञान आपण अधिष्ठित केले पाहिजे.  सूर्य पूर्व दिशेला अधिष्ठित होतो, आपण पौर्वात्य देशच आहोत. आता आपला देश ज्ञानसूर्याने तळपत ठेवला पाहिजे. यासाठी हा प्रकाश प्रखर होऊ देण्याचे कारण नाही, पण दीपज्योतीप्रमाणे तो तेवत राहिला पाहिजे. त्यात पृथ्वीवरच्या सर्व चराचर सृष्टीचे कल्याण, हीच भावना असली पाहिजे. आपल्या शेतीपरंपरेचा जो अर्थ पूर्वजांनी सांगितला आहे, परंपरेने घालून दिला आहे, तो जतन करत राहण्यासाठी या दिवाळीच्या निमित्ताने त्या सर्वांचे स्मरण करूया आणि हे मानवकल्याणाचे ज्ञान सगळ्या जगामध्ये पसरण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करूया!!

Back to blog