२०१९ सालाचा पूर्वार्ध संपला. या कालावधीतील राजकीय तापमान निवडणुकांमुळे खूपच वाढले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या आणि प्रचार सभांचा धुरळा उडत होता; मतमोजणी होऊन भारताच्या केंद्रस्थानी भारतीय जनता पार्टीचे सरकार एकदाचे सत्तेवर आले. राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरच त्यांचे कार्यकर्ते आणि आपण सामान्य जनताही त्या वातावरणात गुंतून पडलो होतो. त्यामुळे इकडे हवामानात सुरू झालेल्या प्रखर उष्णतेच्या लाटा सरकारकडून आणि ग्रामीण व्यवस्थेकडूनही काही काळ दुर्लक्षितच झाल्या होत्या.

मे महिन्याच्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्यानंतर देशभरात सर्वत्र उष्णतेच्या वाढत्या लाटा सर्वांना जाणवल्या आहेत. गेल्या साधारण पाच-सात वर्षांत उष्णतेचा पारा वाढत चालल्याचे जाणवते आहे. पश्चिम महाराष्ट्रात तीन-चार दशकांपूर्वी ३८-३९ अंश इतका उष्णता सहसा ओलांडत नसे. नागपूर आणि वऱ्हाड प्रांतात ४०-४२ अंश तापमान कसे काय सहन होत असेल, असे त्या काळात वाटायचे. चालू वर्षी हा उच्चांक पश्चिम महाराष्ट्रानेच ओलांडला आणि विदर्भात तर तापमान ५० अंशांकडे झेपावत होते. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यानंतर, चारा-पाण्याची टंचाई पुढे जाणवणार अशी चिन्हे दिसत होती. शासनाकडून जलसंधारणाची कामे धडाक्याने हाती घेतली गेली. त्यांचा थोडा फार अनुकूल परिणाम झाला.
परंतु शेतीच्या क्षेत्रामधील आणि नागरी वस्तीमधील पाण्याचा वापर इतक्या थराला गेला आहे की, जलसंधारणाचे कितीही प्रयोग आणि प्रयत्न केले तरीही ते अपुरेच पडत जातील! याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजात जलसाक्षरता आलेलीच नाही. पाणी कसे वापरावे याची शिकवण जाणत्या बाळापासून दिली गेली पाहिजे. पाण्याचा वापर शहरी भागात दरदिवशी वाढतच चालला आहे. माणसाच्या गरजेसाठी एकदा-दोनदा वापरलेले पाणी शुद्ध करून ते शेतीक्षेत्राला दिले जावे, अशी गरज आहे. शेतीला पाणी हवे, आणखी हवे, भरपूर हवे... या प्रकारची अधाशी वृत्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. पिकासाठी गरजेनुसार पाणी मिळायला हवे, याबद्दल वादच नाही; पण गरजेइतकेच ते वापरणे याची जास्त गरज आहे.
विटा, कडेगाव, खानापूर, आटपाडी हा सांगली जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग आहे. सह्याद्रीच्या उतार भागावर असल्यामुळे तो मुख्यतः माळरानाचा आहे. पाच-पंचवीस वर्षांपूर्वी तिथे कोरडवाहू शेती होती. मूळच्या दुष्काळी म्हणविल्या जाणाऱ्या या भागात टेंभू योजनेचे पाणी फिरू लागले. त्यानंतर हा भाग आता उन्हाळ्यातसुद्धा हिरवागार दिसू लागला आहे. जमिनीला पाणी मिळू लागताच बहुतांशी सर्वच शेतकऱ्यांनी भाजीपाला शेती सुरू केली. त्या शेतीलाही कमीत कमी पाणी, सेंद्रिय खते, अॅब्झॉर्बर यांसारख्या नवीन तंत्रांचा वापर, शक्यतो ठिबक सिंचन, शेततळ्यांची निर्मिती, कडक उन्हाळ्यात जमिनीला आच्छादन करणे अशा उपायांकडे आपले शेतकरी अजूनही जाणीवपूर्वक लक्ष देत नाहीत. मग या योजनांचे पाणी बांधाजवळून वाहू लागले की, आपापल्या शेतीभातीतून तलाव भरल्याप्रमाणे पाणी पाजले जाते. तलावतळी ग्रुप करून शेतीला पाणी सोडले जाते. तलावातील पाणी संपले की पुन्हा 'आणखी, आणखी पाणी सोडा' म्हणून अधिकाऱ्यांवर आणि पुढाऱ्यांवर दबाव आणला जातो, आणि दुसरीकडे पाटकऱ्यांचे पाय धरण्याची वेळ येते.
ही परिस्थिती ताकारी, आरफळ, मिरज, म्हैशाळ, टेंभू या अपार सिंचन क्षेत्रांत, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आणि देशभरात सर्वत्र दिसत आहे. पाणी म्हणजे जीवन — हे तर सर्वमान्य आहे. ते बहुमोल आहे आणि मर्यादित आहे. पाणी नसेल तर शेती क्षेत्र व्यर्थ आहे. हे सारे तत्त्वज्ञान शेतकऱ्यांना माहिती आहे, पण आचरणातील जागरूकता अभावानेच दिसते. आजच्या पद्धतीनुसार शासनाने सढळपणे प्रयत्न करून पाणी उपलब्ध करून द्यावे, आणि भूमिपुत्रांनी मात्र ते पाणी नुसते अपच वापरले तर अतिशय मोठ्या दुष्काळाला तोंड द्यावे लागेल, अशी साधार भीती वाटते आहे. तशी भीषण वेळ आली तर आपण माणसे आणि पशुधन यांचे काय होईल? याची कल्पनाही अंगावर काटा आणते.
अशी परिस्थिती येऊ नये म्हणून जलसंधारण आणि संवर्धन हा विषय, निदान शेतकऱ्यांनी तरी आजपासून नव्हे, आत्तापासूनच मनावर घेतला पाहिजे. पिकाला जेमतेम गरजेइतकेच पाणी देण्याबरोबरच शेताशेतांतून, पलाण-बांधांतून, पडीक जागांमधून वृक्षलागवडीची मोहीम शेतकऱ्यांनी हाती घेतली पाहिजे. जमिनीचा आच्छाद आणि आच्छादन झाडांनी आच्छादून गेला पाहिजे. यासाठी या मोसमात मोहीम हाती घेऊया. पुढची दोन-तीन वर्षे त्या वृक्षलागवडीची निगराणी केली तर, कित्येक वर्षे आपल्या शेतीमधील सेंद्रिय खताची, आच्छादनासाठी पाला-पाचोळ्याची, आणि जमिनीत पाणी खोलवर मुरविण्याची कामगिरी ही वनसंपदा करणार आहे. हे जाणून घेऊन काम केले पाहिजे. वृक्षारोपणाचे काम म्हणजे वनविभागाने किंवा कुठल्यातरी शासकीय प्रचाराने करण्याचे काम नव्हे. प्रत्येक शेतकऱ्याने आणि त्याच्या प्रत्येक कुटुंब सदस्याने झाडे लावण्याची मोहीम सुरू केली पाहिजे. कोणती झाडे कुठे लावावीत, या विषयीची माहिती याच अंकात दिली आहे, ती उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे.