न करावे ध्यान, न लागे ब्रह्मज्ञान माझी आहे खूण वेगळीच।
न करावी स्तुती न वाखाणी कीर्ती धरिली ते युक्ती वेगळीच॥
- संत नामदेव
जगात संकट पण भारतीय शेतीला संधी
गेल्या सुमारे दोन महिन्यांत अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. त्याआधी युक्रेन-रशिया आणि मधल्या काळात गाझापट्टीतील इस्रायल - हमास अशी युद्धे चालू होती. पाकिस्तानला झटका देणारे ऑपरेशन सिंदूर भारतानेही यशस्वी पार पाडले; तोही काळ युद्धाची चाहूल देणारा ठरला.
या प्रकारे जगाच्या पाठीवर सर्वत्र युद्धाचे वातावरण असले तरी, अमेरिका - इराण यांच्या ताज्या युद्धामुळे जगात सगळीकडे संकट कोसळल्यासारखे ऊर बडवणे सुरू आहे. भारतातील प्रसारमाध्यमे ही त्यात कमी नाहीत. स्वयंपाकाचा गॅस मिळत नाही म्हणून रांगा लागून हाणामारीची वेळ येत असल्याचे दृश्य आपण पाहतो - वाचतो. परंतु प्रत्यक्षात कोणाच्या चुली थंडावल्या, किंवा पोटाला फाके पडले असे तर दिसत नाही. पेट्रोलची टंचाई म्हणावी तर रस्त्यावर कुठे वाहने कमी झालेली नाहीत आणि पेट्रोलचे दरही वाढलेले नाहीत. तरीसुद्धा या युद्धामुळे आपल्याला झळ बसते आहे असा ओरडा सुरू आहेच.
हे संकट इतर देशांवर निश्चितच आहे. कारण त्यांचे संपूर्ण आयुष्यक्रम पेट्रोल डिझेलवरच अवलंबून आहेत. पश्चिमी राष्ट्रे प्रामुख्याने व्यापार आणि उद्योग यांवरच अवलंबून आहेत. भारतात मात्र शेती हा प्रमुख उद्योग आहे. अर्थात गेल्या काही वर्षांत रासायनिक शेतीमुळे आपल्यालाही त्या युद्धाने आणलेली पेट्रोल इंधनाची टंचाई जाणवू जाणवू शकते. पेट्रो इंधने ही युरिया फॉस्फेट वगैरे रासायनिक खतांसाठी आवश्यक असतात. त्याचप्रमाणे शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर, ऑइल इंजिन्स आणि साध्या फटफट्यासुद्धा पेट्रोलवरच अवलंबून आहेत. म्हणूनच आपल्याकडचा शेती उद्योगसुद्धा अडचणीत येऊ पहात आहे.
परंतु आपल्या शेतीवर दिसणारे परिणाम हे तात्कालिक आणि भासमान आहेत. मुख्यतः आपला निर्यात होणारा शेतीमाल बंदरात अडकून पडतो आहे ही गोष्ट खरी. द्राक्ष केळी या मालाची निर्यात थांबल्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. तसेच कांदा तांदूळ या वस्तूंची निर्यातही बंद पडू लागली आहे. परंतु त्यामुळे ही उत्पादने स्थानिक ग्राहकांना स्वस्तात उपलब्ध व्हायला हवीत, तसे अजून तरी दिसत नाही. केळी द्राक्षे किंवा कांदा यांचा दर स्थानिक बाजारातसुद्धा कणमात्र कमी झालेला नाही हे गौडबंगाल आहे.
सेंद्रिय शेतीचा विचार करणाऱ्या भारतीय भूमीच्या शेतकऱ्यांना असल्या अडचणींवर मात करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पेट्रोल केमिकलच्या आधारे निर्माण होणारी रासायनिक खते बाजारात कमी येतील, किंवा आली तरी त्यांचे दर खूप वाढलेले असतील. पर्याय म्हणून सेंद्रिय खत निर्मितीकडे आपल्या शेतकऱ्यांनी तातडीने वळले पाहिजे. शेणखत, कंपोस्ट खत आणि सोनखतसुद्धा आपली शेती पिकवू शकते आणि सुधारू शकते. ती संधी आपण घेतली पाहिजे. शेणखत हवे असेल तर गायीगुरांची संख्या वाढली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान दोनतीन जनावरे असलीच पाहिजेत. शेतातील पालापाचोळा आणि इतर सेंद्रिय पदार्थ कुजवून त्याचे कंपोस्ट केले पाहिजे. शहरांतून पडणारा कचराही गोळा करून त्याच्यातून कंपोस्ट बनविण्याच्या योजना काही नगरपालिकांमध्ये सुरू आहेत. त्यांनी निर्माण केलेले कंपोस्ट आपल्याला सहजी वापरता येईल. जैविक खतांचा वापर वाढला पाहिजे. त्यायोगे आपल्या जमिनी सुदृढ बनत जातील. शेतीमधील पिकांवर रोगकिडींचे प्रमाण कमी होईल. त्यामुळेच विषारी औषधांचा वापरही कमी होईल. जैविक खते आणि जैविक औषधांचा वापर वाढवून असल्या कृत्रिम संकटावर आपल्याला मात करता येऊ शकते आणि दीर्घकाळासाठी भारतीय शेतीचा उत्तम पर्याय रुजू करून तो रुळवता येण्यासारखा आहे.

बायोगॅसचा वापर सर्वत्र वाढला पाहिजे. शहरी जीवनातील स्वयंपाकघरातही खूप अन्न वाया जाते. त्यापासून बायोगॅसची निर्मिती झाली पाहिजे. मोठ्या सोसायट्यांच्या बाहेर काही जागा उपलब्ध असते. तिथे छोटे बायोगॅस प्लांट उभे करून किमान काही कुटुंबांची गरज निश्चितपणे भागू शकते. घरच्या बागेला खत मिळते. स्वच्छ ऊर्जा हवी म्हणून परकीय आयातीकडे लक्ष न देता आपण ठणकावून उभे राहणे ही खरी गरज आहे.
भारतात प्रचंड सौरऊर्जा आहे. त्याचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती आणि स्वयंपाकपाणी व मोठ्या कारणांसाठीसुद्धा त्याचा वापर करता येऊ शकतो. तेल किंवा पेट्रोकेमिकल यांच्यावर अवलंबून न राहता त्या ऊर्जेला आपण पर्याय देऊ शकतो.
वास्तविक रासायनिक खतांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवसृष्टी घटत जात आहे. तसेच पिकाला पाण्याची गरजही वाढत जाते. म्हणजे रासायनिक शेतीमुळे आपण दुहेरी नुकसान करून घेतो आणि अल्प फायदा शोधत बसतो. जमिनीला मुबलक सेंद्रिय खते दिली तर भूमीतील जीवसृष्टी कार्यरत राहील. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढत जाईल. पिके चांगली येतील. त्याचबरोबर रासायनिक खते आणि औषधे यांचा वापर कमी होईल. अर्थातच आरोग्यदायी उत्पादने वाढत जातील. पौष्टिक अन्न मिळेल आणि उत्पादनखर्चात बचत होईल. हे सर्व लाभ आपल्याला निश्चितपणे मिळू शकतात.
निर्यात करण्यात अडचणी असल्या तरीही, आपल्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढविणारे पदार्थ आपण निर्माण करण्याचा प्रयत्न गावोगावी केला पाहिजे. द्राक्षापासून बेदाणे - मनुका, तसेच केळ्यांचे व बटाट्याचे वेफर्स, रताळ्याचे वेफर्स अशा वस्तूंना आपल्याकडे भरपूर मागणी असते. पेरू संत्रे लिंबू यांचे ज्यूस किंवा लोणची तयार करून बाटलीबंद विकता येतील. अशा उद्योगांना प्रचंड भांडवल लागत नाही. आपल्याकडे तर सहकार चांगला रुजला आहे, सहकारी तत्त्वावर असे उद्योग उभारले तर गावातल्या तरुणांना रोजगार मिळेल आणि शेतीमालाला उत्तम किंमतही येऊ शकेल. शिकल्या-सवरलेल्या नवीन पिढीने त्या दृष्टीने विचार करायला हवा.

सध्या आपल्याकडे इंधनाचा भरमसाठ वापर करण्याची सवय लागली आहे. योग्य त्या वाहतुकीसाठी काही प्रमाणात इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल हे तर हवेच. पण त्यातला पुष्कळचा भाग शरीरश्रमांनी वाचू शकेल. दुचाकी चारचाकींचा वापर कमी केलाच पाहिजे. चार दोन किलोमीटरच्या शेतावर सायकलवरून किंवा पायीसुद्धा जाता येते. पन्नाससाठ वर्षांपूर्वी मोठ्या शहरांतूनसुद्धा सायकलींचा वापर भरपूर होता, आजकाल छोट्या गावातसुद्धा सायकलचे दुकान शोधूनही सापडत नाही. खेड्यापाड्यांतून सरसकट सायकल वापरली पाहिजे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण कष्ट विसरत चाललो आहोत. शेतकरी म्हटले की तो कष्टकरी, असे समीकरण मतलबी लोक वापरत असतात. पण आपल्याकडचे पुष्कळचे शेतकरी आता कष्टच विसरत चालले आहेत. रस्त्यातून पायी चालणारी माणसे सहसा दिसत नाहीत. वाहतुकीसाठी बैलगाड्या घोडागाड्या वापरायला काही हरकत नाही. शेतीमध्ये बैलांची ऊर्जा आपण वापरण्याचे बंदच झाले आहे.
तेलावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी हे सगळे मार्ग आता पुन्हा स्वीकारावे लागतील आणि त्याचा भरपूर फायदा आपल्या शेतीला आणि लोकजीवनाला होईल. स्कूटर मोटरसायकल किंवा कार अशा वाहनांची संख्या कमी झाली तर पायांना आणि शरीराला व्यायाम घडेल. गुडघेदुखी आणि पाठीची दुखणी तसेच रक्तदाब मधुमेह असली नवी प्रकरणे खेडोपाडीसुद्धा वाढत चालली आहेत. अतिवेगामुळे अपघातांचे प्रमाणही वाढते आहे. म्हणूनच काही प्रमाणात चालणे, सायकल वापरणे आणि जनावरांची ऊर्जा वापरणे आता ठरवून योजून सुरू केले पाहिजे. त्यातून प्रदूषणाला आळा बसेल आणि जमिनीचा कस वाढवून अन्नाची प्रतही सुधारेल. लोकांचे आरोग्य सुधारेल. शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच वापरली पाहिजे. म्हणजे पेट्रोल इंधन पुष्कळ प्रमाणात कमी लागेल.
हे सर्व उपाय योजले तर ढोबळ अंदाजाप्रमाणे प्रत्येक खेडेगाव किमान 40% पेट्रोल इंधन वाचवू शकेल. थोड्याशा धीराने प्रयत्नपूर्वक आणि योजनापूर्वक काम केले तर अल्पावधीतच दुप्पट फायदा शेतीच्या क्षेत्रात दिसू लागेल. आपण धीराने उभे राहणे गरजेचे आहे.
सेंद्रिय शेतीचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांना हे अवघड वाटणार नाही. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात. आपण संकट हीच संधी आहे असे मानले पाहिजे. प्राप्त परिस्थितीत भारतीय शेतकऱ्यांनी खंबीरपणे उभे राहून मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. वास्तविक हे पर्याय नवे नाहीत. काही वर्षांपूर्वी आपण याच पद्धतीची शेती आणि याच पद्धतीचा आयुष्यक्रम अनुसरत होतो. मधल्या काळात आपणच त्यापासून दुरावलो आणि नसत्या संकटात विनाकारण सापडलो. आता हे संकट झुगारून देऊन पुन्हा आपल्या मातृभूमीत रुजलेल्या पद्धती अंगीकारल्या पाहिजेत. शेतीमधील यांत्रिक आणि रासायनिक युगाकडून जैविक, शाश्वत आणि पुनर्वापराचे युग निर्माण करणे गरजेचे आहे आणि ठरवले तर ते सहज शक्यही आहे. भारतीय शेतकरी हा रडतराऊत नव्हे, तर आभाळ कोसळले तरी त्यावर पाय देऊन उभे राहण्याची हिंमत त्याच्याकडे आहे. - त्याचा प्रत्यय आता आलाच पाहिजे!!