महिला दिन विशेष: परंपरा, सन्मान आणि सशक्त स्त्रीचा नवा विचार

महिला दिन विशेष: परंपरा, सन्मान आणि सशक्त स्त्रीचा नवा विचार

क्षण तुझ्या गौरवाचा, तोरणे ही सजली 

जागर करण्या स्त्रीशक्तीचा सृष्टीही बहरली। 

महिला'दीन' नकोत, सशक्त विचाराच्या हव्यात


महिला दिनाचा उत्सवी कार्यक्रम करून, महिलांचे महत्त्व ठासून मांडण्याची निदान भारतात तरी फारशी गरज नाही. कारण पूर्वापार या भूमीने मातांचा आणि महिलाशक्तीचा सन्मान केलेला आहे, स्तुती केली आहे आणि पूजासुद्धा केली आहे. आद्य शंकराचार्यांनी  सांगून ठेवले आहे की, 

कुपुत्रो जायेतक्वचिदपि कुमाता न भवति। (पुत्र दुराचारी असू शकतो, पण माता कदापि तशी असू शकत नाही.) 

आपल्याकडे मनुस्मृतीचे नुसते नाव घेतले तरी त्यावर अकारण झोड उठते. वास्तविक मनू, याज्ञवल्क्य, कपिल, वशिष्ठ ह्या सगळ्या ऋषीवर्यांनी त्या त्या वेळची सामाजिक स्थिती लिहून ठेवलेली असते, त्याला स्मृती असे म्हणतात. मनुस्मृतीने  "असे वागले पाहिजे" असे म्हटलेले नाही. त्याचा नीट अभ्यास केला तर पुष्कळ गोष्टी नव्याने स्पष्ट होऊ शकतील.

'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति'  असे म्हटले म्हणून त्याचा अर्थ 'स्त्रीला स्वातंत्र्य मिळत नाही' एवढाच घेतला गेला. वास्तविक त्या श्लोकाच्या आधीचे तीन चरण संदर्भासाठी लक्षात घेतले पाहिजेत. तो श्लोक असा आहे,

पिता रक्षति कौमारे
भर्ता रक्षति यौवने
रक्षन्ति स्थाविरे पुत्रा:
न स्त्री स्वातंत्र्यमर्हति॥

म्हणजे मुलगी लहान असताना तिचे रक्षण पिता करतो, तरुणपणात स्त्रीचे रक्षण पती करीत असतो, आणि वृद्धापकाळी तिचे पुत्र तिला सांभाळत असतात.  म्हणजेच स्त्रीला स्वतंत्र असे स्थान सहसा मिळत नाही. ही परिस्थिती त्याकाळी होती आणि पुष्कळ अंशी आजही आहे. त्याच मनूने म्हटले आहे की,

 यत्र नार्यस्तु पूज्यन्ते

 रमन्ते तत्र देवताः॥

 (जिथे स्त्रीचे पूजन होते तिथे देवता वास करून असतात)

आठव्या शतकात आपल्याकडे आक्रमक शिरले आणि त्यांच्या कलुषित दृष्टीला पडू नये म्हणून स्त्रियांना माजघरात कोंडून राहावे लागले. त्या पुढच्या शेपाचशे वर्षांत ही स्थिती बिकट झाली आणि त्याच रूढी बनून गेल्यामुळे, गेल्या शतकापर्यंत महिलांना चूल आणि मूल एवढ्यावर बंदिस्त रहावे लागले.

तरीही आपल्या संस्कृतीत 'राधेकृष्ण, सीताराम, लक्ष्मीविष्णू, पार्वतीपते...' असा जप करताना प्रथम स्त्रीचे नाव घेतले जाते.

भारत देशाची मूळ प्रवृत्ती वेगळी होती आणि स्वातंत्र्यानंतर त्याचा विचार नव्याने करावा लागला. म्हणूनच 8 मार्च हा दिवस जगाबरोबरच भारतामध्येही साजरा केला जातो. महिलादिन म्हणून तो मान्यता पावलेला आहे. न्यूयॉर्क (अमेरिका) येथे 1908 साली महिलांच्या हक्कांसाठी आंदोलन झाले, त्यावेळी क्लारा झेटकिन या महिलेने महिला दिवस साजरा करण्याची कल्पना प्रथमच मांडली. त्यानंतर खूप उहापोह होत गेला. अमेरिकेत तर कित्येक वर्षेपर्यंत महिलांना मताचासुद्धा अधिकार नव्हता. त्याउलट भारतात स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर संविधानाने भारताच्या सर्व स्त्री-पुरुष प्रौढ नागरिकांना पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार दिलेला आहे. कारण संविधानाला या भूमीतील पूर्वसंस्कारांचा पाया होता, आधार होता. संयुक्त राष्ट्रांमध्ये जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना मान्य होण्याला 1977 साल उगवावे लागले. त्यानंतर दरवर्षी 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा होत असतो.

शेतीच्या बाबतीत महिलांना अनन्यसाधारण स्थान आहे. बीज संकलन, बीज प्रक्रिया, निवड, इथपासून शेतीची मशागत आणि पिकाची सुगी होईपर्यंत महिला पुरुषांच्या बरोबरीने राबत असतात. शिवाय घरची जनावरे, दुभत्या गायीम्हशी सांभाळण्याचे, शेळ्या कोकरे यांची देखभाल करण्याचे सगळे काम महिला करीत असतात. तथापि शहरांमध्ये महिला आणि पुरुष यांची समानता दर्शविण्यासाठी महिलांना पुरुषी वागण्याचे आणि त्याच दृष्टीने पाहण्याचे एक नवे खूळ मधल्या काळात पिकले. महिलांनी पॅन्ट शर्ट घातला तर पुरुषांची बरोबरी होईल असे नव्हे. मूलतः त्यांच्या मनावर रुजलेले दुबळेपण नाहीसे झाले पाहिजे. गेल्या वर्षी पाकिस्तानला भारताने ऑपरेशन सिंदूरमधून जी अद्दल घडवली त्याचे इत्थंभूत वर्णन करण्यासाठी सैन्य आणि वायुदलातील दोन महिला-अधिकारी पुढे आल्या होत्या. त्याचप्रमाणे हल्ली काही ठिकाणी रेल्वेगाड्या, बसेस चालविण्याचे काम महिला करू लागल्या आहेत हे खरे. 

शेतीच्या बाबतीत आपल्याकडे महिलांना पूजनीय स्थान दिले गेले आहे. गणेशचतुर्थीचा दुसरा दिवस कृषीपंचमी (आपण ऋषिपंचमी म्हणतो) आपल्याकडे असते. त्या दिवशी ज्या शेती उत्पादनास बैलाचे श्रम कारणीभूत नाहीत, असे खाद्यपदार्थ सेवन केले जातात. दारातली भाजी, मांडवावरच्या वेलींच्या फळभाज्या, फळे अशा गोष्टी खाऊन तो उपास केला जातो. म्हणजेच महिलांच्या कृषी क्षेत्रातील कामाची ती एक प्रकारे आठवण म्हणून जपली जाते. पूर्वोत्तर (ईशान्य भारत) राज्यांमध्ये आजही काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धती आहे. पुष्कळ कुटुंबातील वर (नवरा मुलगा) लग्नानंतर वधूच्या घरी नांदायला जातो. मुलीचा हक्क वडिलांच्या मिळकतीवर पूर्वापार चालत आलेला असतो. अलीकडच्या काळात आपल्या राज्यात असे कायदे येऊ लागलेले आहेत. सरकारी नोकरांना तर आपले पूर्ण नाव लिहिताना आईचे नावही दाखल करावे लागते. हे सर्व प्रयत्न रास्तच आहेत. पण ही पद्धती बाहेरच्या कुठल्या देशाकडून आपल्याकडे आली असे समजण्याचे कारण नाही, इतकाच मतितार्थ लक्षात घेतला पाहिजे.

चालू वर्षी आपल्या संस्थेनेसुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने, शेती क्षेत्रात ज्या महिला निष्ठेने काम करीत आहेत त्यांचा गौरव करण्याचे ठरविले आहे. एकेक विषय घेऊन त्या संदर्भात कामगिरी करणाऱ्या पाच व्यक्तींना आपण पुरस्कार देत असतो. एके वर्षी आपण बियाणे हा विषय घेतला तर वृक्षारोपण असाही विषय आपल्या पटलावर येऊन गेला. चालू वर्षी महिला सशक्तिकरणाच्या दृष्टीने, कृषी क्षेत्रातील कर्तबगार महिलांना आपण गौरविणार आहोत. महाराष्ट्र गोवा आणि बेळगाव भागातील पाच महिलांची निवड करण्यात येत असून, त्यांना प्रत्येकी रु. 51 हजार रुपयांचा पुरस्कार नेचर केअरच्या वतीने समारंभपूर्वक देण्यात येत आहे. त्याशिवाय विशेष नोंद घ्यावी अशा महिलांचा परिचय या अंकात देण्यात आलेला आहे. 

ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांमध्ये, मुलीचे शिक्षण झाल्यानंतर तिने शेतकरी नवरा नको म्हणण्याची नवीन चाल पडली आहे. हे शेती क्षेत्रालाच नव्हे तर आपल्या देशाला चुकीच्या वाटेवर नेऊ शकते. मुलींना शिकविलेच पाहिजे, पण त्यांचा भूमीमातेशी आणि शेतीशी दुरावा होता कामा नये. उलट कॉम्प्यूटर किंवा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींनीसुद्धा एक प्रयोगशाळा म्हणून शेतीक्षेत्रात लक्ष घालण्यासाठी खेड्यातील नवरा निवडला पाहिजे. खेड्यातील मुले अडाणी किंवा अशिक्षित असतात असे मुळीच नाही. नेचर केअर परिवारात कुणीही डोकावले तर तेथील तंत्रज्ञान, कर्तबगारी आणि प्रयोगशीलता यांचा प्रत्यय येऊ शकेल. हवामान, सकस अन्न, राहणीमान, माणसाशी जोडणारे नाते, वृक्षवल्लींचे साहचर्य, पशुपक्षांची ओळख आणि आर्थिक स्वावलंबन या सर्व गोष्टी खेड्यात किंवा छोट्या गावांमध्ये सहज शक्य होतात. त्यायोगे सर्व मानवसमाज संपन्न आणि आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो. हे आव्हान समजून खेड्यांतल्या किंवा शहरांतल्या शिकलेल्या मुलींनी नवा विचार केला पाहिजे. त्यातच त्यांचे आणि सकल भारतीय समाजाचे हित आहे.

चालू वर्षाच्या महिला दिनाच्या निमित्ताने, समस्त आदिशक्तीचे साक्षात रूप असणाऱ्या कर्तबगार महिलांना नेचर केअर च्या वतीने सादर प्रणाम!!

Back to blog