पर्यावरणासाठी गो-पालन

पर्यावरणासाठी गो-पालन

गोपालन किंवा गायीसंबंधीचा विषय निघाला की लोकांना त्यात बुरसट धार्मिक विचार दिसतो. शेतीसाठी गोपालन अत्यावश्यक आहे असे कोणी अनुभवातून सांगितले तरी त्याकडे राजकारण म्हणून पाहिले जाण्याची बरीच शक्यता. सध्या आपले संपूर्ण जनजीवन राजकारणाने खाऊन टाकल्यामुळे गोपालनाबद्दल सांगितले की, हे कुठल्यातरी एका जुन्या विचारांचा पक्ष धरून बोलणे आहे असे मानले जाते. कोणताही अभिनिवेश किंवा धार्मिक भावना एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही. आजपर्यंतच्या सेंद्रिय शेतीच्या अभ्यासावर आणि प्रत्यक्ष शेतामधील प्रयोगांतून समोर येणाऱ्या परिणामांवर आधारित हा विषय आहे. भारतीय गायींच्या संगोपनाइतकेच सेंद्रिय शेती आणि अतिउच्च प्रतीचे शेती उत्पादन या दृष्टींनी गायी पाळणे अत्यावश्यक आहे. 

आपल्याकडे पर्यावरणासाठी आणि झाडांच्या संगोपनासाठी जगभरात खूप काही बोलले जाते. वर्षातल्या अनेक दिवशी वृक्षांचे महत्त्व ठसविण्याचे प्रयत्न होत असतात. २१ मार्च हा जागतिक वनदिन म्हणून साजरा होतो. २३ मार्चला जागतिक हवामानदिन, २२ एप्रिल हा वसुंधरादिन, ५ जून पर्यावरणदिन, २३ जुलै वनसंवर्धनदिन, १ ऑगस्ट वनमहोत्सवदिन... हे साजरे होत असतात. एवढेच कशाला, ७ ऑक्टोबर हा वन्यपशू दिन म्हणून मानला जातो. म्हणजे वर्षातील एक दिवस वन्यपशूचे महत्व लक्षात येण्यासाठी योजना आहे; पण गोपालनाचे महत्व सांगणारा एखादा दिवस भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये नाही हे आश्चर्य आहे! पर्यावरणदिन साजरा करण्यामध्ये गैर काहीच नाही; पण पर्यावरणाचे खरे प्रतिक गाय हे आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. 

वरील सर्व दिवसांमध्ये वृक्षांची पूजा केली जाते, वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात, वृक्षतोड रोखण्याबद्दलचे महत्त्व लक्षात आणून दिले जाते परंतु गायीच्या शेणापासूनही इंधन उपलब्ध होऊ शकते हे मात्र कोणी सांगत नाही. गायीच्या शेणापासून बनलेल्या गोवऱ्या वापरात आणल्या तर, जळणासाठी वृक्षांची तोड करावीच लागणार नाही. गाय असेल तर वृक्षांचे संरक्षणच होईल. झाडांची संख्या वाढवायची असेल तर गायींची संख्या वाढवली पाहिजे हेही लक्षात घ्यायला हवे. झाडांमुळे प्राणवायू मिळतो हे खरेच आहे, पण भारतीय संस्कृतीने प्राणवायूचे प्रमाण वाढविण्याचा आणखी एक मार्ग सांगितला आहे, तो म्हणजे सार्वत्रिक होमहवन. गायीच्या शेणाची एक गोवरी पेटवली आणि त्यावर एक ग्रॅम देशी गायीचे तूप टाकले तर एक टनभर प्राणवायू शुद्ध स्वरूपात मिळू शकतो. म्हणूनच पर्यावरणाचे प्रतिक हे झाड मानायचे की गाय मानायचे, हे आता समजून घेतले पाहिजे. 

सेंद्रिय कर्ब आणि त्यावर जगणारी अब्जावधी जीवसृष्टी यावरती जमिनीतील जिवंतपणा अवलंबून असतो. मातीमधील जिवाणूंचे रक्षण आणि त्यातील आर्द्रता कायम राखणे हे गायीच्या शेणाशिवाय घडूच शकणार नाही. गाय सुरक्षित असेल तरच शेतकऱ्याची जमीन सुरक्षित होऊ शकते. समृद्ध आणि सुपीक हे समीकरण भारतीय शेतकरी विसरत चालला आहे की काय असे वाटू लागते. 

राजकारण्यांनाही त्या गोष्टीचा विसर पडणे स्वाभाविक आहे. कारण शेतकरी जे मागत नाही, त्याकडे राजकारणी लक्ष देत नाहीत. गायीची उपेक्षा हे पर्यावरण बिघडण्याचे प्रमुख कारण आहे असे म्हटले तरी चालण्यासारखे आहे. म्हणूनच पर्यावरणाच्या संतुलनाचा राजमार्ग म्हणजे गोरक्षण आणि गोपालन हाच आहे. या सर्वास अनेक वर्षांचे अनुभव आधाराला आहेत. 

विटा येथील शेतात १९८७ सालापासून म्हणजे गेली ३५-४० वर्षे सेंद्रिय शेतीचा मार्ग निवडून प्रयोग चालू आहेत. गांडूळ शेती, अमृतपाणी, जीवामृत, सेंद्रिय खते इत्यादी वेगवेगळ्या जिवाणू खतांचा वापर केला जात आहे. शेतात अनेकविध पिके घेतली जात आहेत. २००७ सालापासून म्हणजे गेली सुमारे पंधरा वर्षे गोरक्षण व गो संगोपन तिथे सुरू आहे. त्याचे आश्चर्यकारक परिणाम दिसत आहेत. गीर, खिलार, देवणी, थारपारकर अशा केवळ भारतीय वंशाच्या गायी तिथे सांभाळलेल्या आहेत. म्हैस किंवा जर्सी गाय नाही. त्या शेतावर २००७ आणि २००९ साली केशर आंब्याची लागवड केली. २०१२ सालात हापूस पायरी यांचीही लागवड केली आहे. शिवाय नारळ चिकू लिंबू सीताफळ आवळा पेरू अशी अनेक प्रकारची फळझाडे त्या शेतावर आहेत. हा सर्व वृक्षसंभार आणि संपदा आता उत्पादक झाली आहे. विशेषतः आंबे चिकू सिताफळ केळी ही सर्व फळे चवीला अतिशय मधुर आहेत, असे आस्वादकांचे आणि ग्राहकांचे निरीक्षण आहे. नुकतीच तेथील आंब्याच्या झाडांची छाटणी म्हणजे सवळणी केली. त्याकरिता जत भागातील आंबा छाटणी करणारा एक गट, चार दिवस त्या शेतावर काम करीत होता. त्यांचेही मत असेच पडले की, छाटणी करताना चुकून मागे राहिलेले काही आंबे मिळाले; ते आंबे अतिशय गोड तर आहेतच पण अतिशय वेगळी अशी एक आनंददायी चव या फळांना आहे. या जमिनीवरील धान्य, फळे,

भाज्या - इतकेच काय नारळातील खोबरेसुद्धा चवीला वेगळे आहे असा त्या कामकरी गटाचा अभिप्राय आहे. याविषयी सखोल चिंतन करताना, त्या शेतीवरील गायींच्या साहचर्याचा तो परिणाम आहे ही खात्री झाली. गोमातांचे शेण मूत्र व त्यांचे अस्तित्व एवढ्याचा तो परिणाम आहे याची खात्री करून घेतली आहे. 


म्हणूनच गाय म्हैस शेळी यांचे शेण व मूत्र यांचाही तुलनात्मक अभ्यास गेली काही वर्षे करण्यात येत आहे. भारतीय वंशाच्या गायी ३२ जातींमध्ये सध्या तरी उपलब्ध आहेत. त्यांची शिंगे, वशिंड, व मानेखालची पोळी यांवरून भारतीय वंशाची कोणतीही गाय ओळखता येते. तिचे मूत्र इतर कोणत्याही प्राण्याच्या मलमूत्राहून वेगळे आहे. गायीच्या मूत्रात नायट्रोजन सल्फर यासह अबकडई ही जीवनसत्वे आहेत. मँगेनीज लोह सिलिकॉन कॅल्शियम क्षार फॉस्फेट कार्बोलिक ऍसिड, तसेच पाचक द्रव्य (एन्झाइम्स) आहेत. म्हशीच्या मूत्रामध्ये हे घटक थोड्या प्रमाणात असतात. गायीच्या शेणात २४ प्रकारची वेगवेगळी सूक्ष्म द्रव्ये आढळतात. नत्र जास्त प्रमाणात असते. जीवाणूंच्या शंभर प्रजाती व यीस्टचे दोन प्रकार त्यात आढळले आहेत. 

गोमय म्हणजे गायीचे शेण. हा असंख्य जिवाणूंचा साठा असणारा पदार्थ आहे. एक टन गोमयामधून बारा पॉईंट नत्र जमिनीला मिळते. याउलट म्हशीच्या शेणामध्ये काही विघातक जिवाणू आहेत, आणि बॅक्टेरियाचे प्रमाण गोमयाच्या तुलनेत नगण्यच आहे. गायीच्या शेणामध्ये तीन टक्के नत्र, तर म्हशीच्या शेणात ते जेमतेम दोन टक्के आहे. मुख्यतः गायीच्या शेणामुळे शेतीत हुमणीचा प्रादुर्भाव होत नाही. 

हे सर्व लक्षात घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यावर अंधविश्वास ठेवावा असे नाही; पण किमान एक गाय पाळून प्रयोगशील शेतकऱ्यांनी त्याची निरीक्षणे नोंदवून ठेवावीत, म्हणजे त्यांचाही विश्वास बसेल. पृथ्वीच्या पर्यावरणाचे रक्षण आणि भारतासारख्या कृषीप्रधान देशाची प्रगती ही गायींचे पालन, गायींचे संगोपन आणि गायींची वाढ यावरच अवलंबून आहे, प्रयोग निरीक्षण आणि अनुभव तसेच सांगतात. 


 

Back to blog