रस्ते हवेतच, वृक्षही हवेत !

रस्ते हवेतच, वृक्षही हवेत !

भारतामध्ये विकासाचे नवे वारे नव्या जोमाने वाह लागले आहेत. सर्वत्र मूलभूत सुविधा तयार व्हायला हव्यात, अशी सार्वत्रिक मनस्थिती आहे. दळणवळण, संचारव्यवस्था, महामार्ग, वाहने, घरे... अशा सर्वच बाबतीत आपल्याला अद्ययावत् होण्याची गरज आहे, आणि घाई आहे. कुणाचा यात वाद असण्याचे कारण नाही. उत्तमोत्तम वाहने हवीत, त्यांची संख्या भरपूर हवी, त्याचबरोबर रस्तेही प्रशस्त आणि उत्तम हवेत हेही खरे आहे. त्या बाबतीत भारतामध्ये गेल्या पाच-पन्नास वर्षांत दुर्लक्ष झाले आहे हेही मान्य करावे लागेल. छोट्याशा खेड्यातील बोळ-बोळकंडी असो किंवा राष्ट्रीय महामार्ग असोत, आपल्याकडे खड्ड्यांचे प्राबल्य आहे. वाहतुकीच्या मानाने रस्ते अरुंद आहेत. ही परिस्थिती बदलायला हवी. 

त्यासाठी अलीकडच्या काळात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने रस्ते बांधणीचा कार्यक्रम मनावर घेतलेला आहे. हिमालयातील उत्तर सीमेवरतीसुद्धा चांगले रस्ते, त्यावर मजबूत पूल, प्रवाशांना सोयीची वाटेल अशी मुक्काम व्यवस्था हे सर्व हवेच. त्याचबरोबर दक्षिण समुद्रापर्यंत किनारपट्टीचे रस्तेही आवश्यक आहेत. त्या दृष्टीने आपल्याकडे रस्ते बांधणीची लाट आल्याचे दिसते. परंतु दुर्दैव असे की पावसाळा उलटून गेल्यावर शहरातील अगर महामार्गातील खड्डे आणि चिखल यांची दुर्दशा आपल्या वाटणीला येत आहे. रस्ते बांधणीसाठी नव्या जोमाने प्रयत्न करायला हवेत हे खरे आहे. 

रस्ते बांधणीसाठी अनेक विभागांच्या परवानग्या घ्याव्या लागतात. अलीकडे त्यात पर्यावरणाचा विचारही महत्त्वाचा असतो. जुने रस्ते रुंद करताना पूर्वीचे मोड्डठ्ठाले वृक्ष तोडावे लागतात. ते तोडण्याची गरजच आहे असे आपल्यापैकी अनेकांना वाटत असते. आपल्याकडे वृक्षारोपणाचे जे कार्यक्रम होत असतात ते बरेचसे दिखाऊ स्वरूपाचे असतात. आधीच्या वर्षी लावलेली रोपे किती वाढली आणि किती वृक्ष मोठे झाले, याची मोजणी केली तर फार उत्साहवर्धक स्थिती नाही हे लक्षात येईल. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपासून वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत आले आहेत, परंतु ती झाडे किंवा झाडांची संख्या खूप वाढली आहे असे ठोसपणे म्हणता येत नाही. वृक्ष संवर्धन आणि वृक्ष पूजन ही आपली संस्कृती आहे, परंतु जळणासाठी, फर्निचरसाठी, इमारतीसाठी वृक्षतोड करणे हेही आपले सार्वजनिक जीवन बनले आहे. नवे रस्ते बांधले पाहिजेत तर त्यासाठी जुने वृक्ष तोडण्याची गरज आहे हे खरे नाही. नवी वृक्षसंपदा झटपट निर्माण होऊ शकत नाही; त्याला पाच पन्नास वर्षांचा काळ जावा लागतो. 

म्हणून रस्ता जरी हवा असला तरी त्यावरचे वृक्ष नाहीसे करावेत असे मुळीच म्हणता येणार नाही. नवे रस्ते उत्तम प्रतीचे, रुंद आणि काँक्रीटचे बनविण्यात येत आहेत, त्याचबरोबर झाडांची कत्तलही फार सुरू आहे. काही जिल्ह्यांचे इंग्रजाच्या काळातील रेकॉर्ड (गॅजेट्स) पाहिले तर लक्षात येईल की, रस्ते बांधणीचे काम ज्या कंपनीला किंवा कंत्राटदाराला दिले जात 


असे त्याच्याकडेच, रस्त्याकडेला झाडे लावण्याचे कामही सोपविलेले असे. सातारा जिल्ह्याचे एक गॅझेट पाहण्यात आले होते, त्यात रस्ता बांधणीच्या खर्चातच रस्त्याकडेची झाडे लावण्याचे, आणि त्याला पुढची पाच वर्षे पाणी घालण्याचे कामही देऊन, त्याचा खर्च रस्त्याच्या अंदाजपत्रकात समाविष्ट केलेला होता. अर्थात् हा खर्च जरी समाविष्ट केला तरी प्रत्यक्ष पुढची पाच वर्षे झाडांना पाणी घालण्याचे काम त्याकाळी इंग्रज करून घेत असेल. आजच्या काळात तशी अपेक्षा ठेवणे अतिशययोक्ती ठरेल ! तो काळाचा महिमा म्हणून सोडून देऊ. पण रस्त्यासाठी अडचण करणारी झाडे तोडून विकास साधायचा असेल तर वेगळा पर्याय शोधला पाहिजे. 

मूळची प्रचंड झाडे उचलून त्यांचे नवीन खड्ड्यांमध्ये पुन्हा रोपण करून ती जगविण्याचे तंत्रज्ञान जगभर आता रुजले आहे. हे नवे तंत्र आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री उपलब्ध असते. शेकडो वर्षांचे जुने वृक्ष तोडून त्याचे जळण बनविण्यापेक्षा त्याची पुनर्स्थापना केली गेली तर पर्यावरणाच्या दृष्टीने ते फार मोठे काम होणार आहे. रस्त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या अंदाजपत्रकात वृक्ष पुनर्स्थापनेचा खर्च फारच अल्प मानावा लागेल. रस्ते बांधकाम करून घेणाऱ्या विभागांनी याचा विचार अतिशय गांभीर्याने करायला हवा. जुनी झाडे उचलून त्यांचे स्थलांतर करून ती पुन्हा वाढविली गेली तर पर्यावरणासाठी फार मोठी उपलब्धी आपण साधू शकू. 

रस्ते निर्मितीमध्ये अडचण करणारी जुनी झाडे बहुतांशी देशी प्रजातीची असतात. उंबर, वड, पिंपळ, करंज, कडुलिंब, चिंच यांचे वृक्ष - महाराष्ट्रातच काय, सर्व देशभर आपल्याला दिसून येतील. हे वृक्ष दरवर्षी पानगळ होणारे असतात. त्या पानगळीतून धरणीमातेला सेंद्रिय कर्ब मिळतो. ती पानगळ कुजल्यावर सेंद्रिय खतही विनासायास मिळत असते. या वृक्षांच्या सावलीचा निवारा वाटसरूंना आल्हादक असतोच. ही सर्व भारतीय प्रजातीची झाडे, त्यावर अनेक पक्षी आसरा घेतात. त्यांची फळे म्हणजे पक्षी जातींचे फार महत्त्वाचे अन्न असते. ती झाडे पर्यावरण शुद्ध ठेवतात आणि प्राणवायूची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करतात. 

या सगळ्या फायद्यांचा विचार केला तर रस्त्याच्या लगत असणाऱ्या सर्व गावांमध्ये त्याचा खूप उपयोग होईल. त्या मानाने 

ही झाडे स्थलांतरित करून रुजवण्याचा खर्च फार मोठा नाहीच. म्हणून सर्व राष्ट्रीय किंवा राज्य किंवा गावाच्यासुद्धा लहान मोठ्या रस्त्याच्या कडेने पुरातन झाडे पुनर्स्थापित करणे हे काम सरकारी यंत्रणेने करून घेतले पाहिजे. नवी रोपे लावतानासुद्धा भारतीय वृक्षसंपदा जतन करून त्याला निदान पाच वर्षे, कंत्राटदाराकडून किंवा रस्त्याशी लगत असणाऱ्या शेतकऱ्यांकडून पाणी व निगराणी हे काम करून घेतले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांना काही मोबदला मिळण्याची सोय केली पाहिजे. म्हणजे नवीन रस्त्यांचे बांधकामही होईल आणि वृक्षसंपदा सांभाळली जाईल. 

जगभरचा विचार केला तर आपल्या देशातील वृक्षसंपदा खूप कमी झाल्याचे आकडेवारी सांगते. सुमारे तीन वर्षांपूर्वी केलेल्या 

निरीक्षणांमध्ये भारताच्या वृक्षसंपदेमध्ये दर माणशी २८ झाडे आहेत. जगाच्या पाठीवर १५१ देशांमधील लोकसंख्या आणि झाडांचे प्रमाण पाहिले तर भारताचा क्रमांक १२५ वा लागतो. ही परिस्थिती भारत सुजलाम् सुफलाम् म् सुफलाम् असल्याचे सांगत नाही. एखादे झाड तोडले तरी त्यावरच्या पक्षांची घरटी, कीटकांचे विश्व, आणि माणसाचे जीवन विस्कटून जाते. निसर्गाच्या अनेक अनमोल देणग्या स्वाभाविकच नष्ट होतात. एखादे मोठे झाड तोडल्यानंतर होणारे नुकसान, नवीन वृक्षारोपणाने भरून येण्यास फार काळ लागतो. ते नुकसान कोण आणि कसे भरून काढणार हा प्रश्न आपल्याला गंभीर विचार करायला लावणारा आहे. विकास करत असतानाच निसर्गाची हानी करण्याला कायद्यातून कठोर शिक्षेची तरतूद पाहिजे. तशी योजना करण्याची नितांत गरज आहे. झाड वठले की वठवले याची सहज चौकशी केली तरी, नुकसान करणारे कोण आहे, झाडांना वठविणारे कोण आहे ते कळून येऊ शकते. तसा प्रयत्न सरकारने, वन खात्याने, सामाजिक वनीकरण विभागाने, आणि मुख्य म्हणजे सामान्य जनतेने केलाच पाहिजे. या बाबतीत सगळ्यांचीच जबाबदारी फार मोठी आहे. 

अशा विधायक कामगिरीची काही उदाहरणे निश्चितच 

प्रेरणादायी होतील. त्यांपैकी एक सहज आठवते ते असे की, ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज हे देहूचे. त्यांनी राबविलेला एक उपक्रम पाहाण्यात आला. मंगळवेढे ते पंढरपूर या मार्गावर त्यांनी दुतर्फा पिंपळ, वड, चिंच अशा प्रजातींचे वृक्ष तीन-चार वर्षांपूर्वी लावले. त्या दोन झाडांमधील अंतर पुरेसे ठेवले. नीट देखभाल करून ती हजारो झाडे आता डोईच्या वर उंचीची झाली आहेत. अशा हजारो वृक्षांची रोपवाटिका त्यांनी देहू येथे तयार केली आहे. असेच कार्य पुणे शहरातून रघुनाथराव ढोले हे करीत आहेत. अशी काही उदाहरणे सर्वांना ठाऊक असतील. त्यांना बळ मिळाले पाहिजे, ते काम सरकारचे आहे, त्यापेक्षाही ते आपल्यासारख्या वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी जनतेचे आहे. केवळ फोटोपुरते वृक्षारोपणाचे कार्यक्रम करून थांबता येणार नाही. 

आपल्याला विकास हवा आहे, आणि मोठ्या वृक्षांच्या रूपाने आपण अनेक प्रकारचा विकास साधू शकणार आहोत. गरज आहे ती आपल्या सकारात्मक मानसिकतेची, आणि चांगल्या नियोजनाची; त्याहीपेक्षा काटेकोर अंमलबजावणीची !! वृक्षाचे प्रेम केवळ दाखविता येत नाही, ते वृक्षांनाच कळते. वृक्षप्रेमींना ते कळले पाहिजे. 


 

Back to blog