सुमारे एक दीड महिन्यापूर्वी आपल्याकडे पाऊस झाला. ऐन पावसाळ्याचा झिंबड पाऊस सुरू झाला असे वाटले, तो जेमतेम आठ दहा दिवस टिकला. पुरेसा होण्यापूर्वीच तो पाऊस थांबला. नंतर ताप पडू लागली. मशागतीसाठी ती उघडीप ठीक आहे असे वाटले, पण पुढचा पाऊस सुरूच झाला नाही. आपल्याकडची धरणेही पूर्ण भरलेली नाहीत. थोडक्यात म्हणजे आज तरी टंचाईसारखी परिस्थिती दिसू लागली आहे.
यापुढे एक-दोन महिने पावसाचे आहेत. स्वाती नक्षत्रापर्यंत पाऊस कृपावंत झाला तर बेजमी होऊ शकेल. पण ते सर्व भविष्य अधांतरी दिसते आहे. अशा परिस्थितीत आपल्या शेतीबद्दल आणि एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता वाटणे, वाढणे स्वाभाविक आहे.
यादरम्यान काही ठिकाणी विदर्भात आणि उत्तर भारतात -पाऊस कोसळला आहे. त्याने खूप नुकसान केले. अशा प्रकारे एकदम भरपाई करून पाऊस समाधान करू शकत नाही. एकाच वेळी चाळीस भाकरी खाणे माणसाला सोसणार नाही. दररोज एक भाकरी असेच प्रमाण लागते. तसा भीज पाऊस, धुवाधार पाऊस, वळीव पाऊस आणि अधूनमधून पाऊस हेच नैसर्गिक होते. तो काळ आता मागे पडला हे उघड दिसु लागले आहे.
अर्थातच अशा अनैसर्गिक वातावरणामुळे खचून जाणे टाळले पाहिजे. आपल्याकडे तंत्रशास्त्र खूपच विकसित होऊ लागले आहे. चंद्रावर आपण पोचण्याची धडपड केली आणि तिथे जे काही उपलब्ध आहे ते आपल्याला कसे लाभदायक होईल असा शोध घेण्याचे काम चालू झाले आहे. त्याचबरोबर इकडे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाने वेग घेतला आहे. ५जी म्हणजेच संगणकाची किंवा आंतरजालाची पाचवी पिढी आता लवकरच रूढ होईल असे दिसते. त्यामुळे आपल्या मोबाईल व कॉम्प्युटरचा वेग खूप वाढेल आणि हजारो प्रकारची कामे त्यावर करता येतील. तोपर्यंतच ६ जी ची धाव सुरू झाली आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे किती गती येईल याचा अंदाज व्यक्त होऊ लागला आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये समजा पाच सफरचंदे आणि दोन लिटर दूध अशी साठवणूक असते. फ्रीजमध्ये सेन्सर बसवल्यामुळे दूध एक लिटर वापरून झाले की बाकी एक लिटरची ऑर्डर फ्रीजमधूनच गवळ्याकडे आपोआप जाईल. माणसाला काही करावे लागणार नाही. त्याचप्रमाणे सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीरात कॅल्शियम किती, हिमोग्लोबिन किती, साखर किती हे सेन्सरमुळे आपोआप मोबाईलवर समजेल आणि त्यासाठी आज तुम्ही कोणते पदार्थ खायचे तेही मोबाईलवरच माणसाला समजेल. थोडक्यात म्हणजे त्या क्षेत्रामध्ये विलक्षण गती येणार आहे. त्यामुळे माणसांचे रोजगार खूप बदलतील किंवा काही बंद होतील. ते मनुष्यबळ शेतीकडे वळू शकेल. शेतीच्या क्षेत्रात त्या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करून घेता येईल असे पाहिले पाहिजे. आपल्याकडे एकूणच शेतीकडे लक्ष देणे फारसे प्रचलित नाही. म्हणून ती वाट शोधण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागेल.
शेतीमध्येही त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. उदाहरणार्थ मातीमध्ये किती सामू आहे, कोणते खत किती प्रमाणात आवश्यक आहे, पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे कोणते घटक सोयीचे पडतील, पाणी काटकसरीने म्हटले तरी किती घालावे लागेल, आणि दुष्काळी वातावरणात कोणते पीक कधी घेता येईल..... हे सगळे आपल्याला मोबाईलवर समजू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान शिकून घेण्यास पर्याय नाही. आधुनिक शेतीसाठी आधुनिक बुद्धिमत्ताही आवश्यक आहे.

शेतक-यांच्या मुलांनी आता अडाणी राहून चालणार नाही, किंवा अडाणी लोकांनी शेती करावी हेही मान्य होणार नाही. आपल्याकडे नोकरी करणारा माणूसच कामाचा मानला जातो. एका घरात दोन भाऊ असतील तर थोरला भाऊ नोकरी करतो; आणि 'दुसरा भाऊ काय करतो?' - त्याचे उत्तर 'काही नाही, शेती करतो !' असे दिले जाते. शेती करणे म्हणजे काही न करणे, असे सरधोपट विधान शेतकरीसुद्धा करतात. ते अत्यंत अयोग्य आहे. उलट 'हा मुलगा शेती करतो' हे छाती काढून सांगावे; आणि 'नाइलाज म्हणून दुसरा नोकरी करतो' हे फारतर सांगावे, अशी परिस्थिती शेतीमध्ये येण्यासाठी दुष्काळ ही एक अडचण होणार आहे. पण अडचणींवर मात केली तरच तो खरा शेतकरी !
अद्यापि दीड दोन महिने पावसाचे आहेत. त्यामध्ये जो काही पाऊस पडेल तो कसा जपून वापरायचा आणि जमिनीत कसा मुरवायचा याचे आडाखे आतापासूनच बांधले पाहिजेत. या सगळ्याचा सराव आपल्या मुलांना आणि तरुण पिढीला दिला पाहिजे. त्याचबरोबर सेंदिय शेतीसाठी आवश्यक ते घटक निसर्गाने उपलब्ध करून दिलेले असतात, तेही काटेकोरपणाने वापरून माती तरी समृद्ध करायला हवी. एखादे वर्ष पाण्याची टंचाई राहिली तरी, जेव्हा कधी पाणी उपलब्ध होईल तेव्हा याच्या अनेक पटीने शेती पिकवून ती कसर भरून काढता येईल. म्हणून पाऊस आपल्यावर रुसला तरी आपण पावसावर न रुसता त्याची आराधना करावी, पण तोपर्यंत आपले प्रयत्न थांबवू नयेत, इतकेच ठरविले पाहिजे !!