विषवल्लीच्या विचित्र विळख्यात

विषवल्लीच्या विचित्र विळख्यात

विषवल्लीच्या विचित्र विळख्यात 

धूर धूळ दुर्गंधी यांनी भरलेली हवा, रसायने सांडपाणी क्षार यांनी भरलेले पाणी, आणि निकस विषमय बाधक अन्न यांमुळे भारतात सजीवांचे जगणे कठीण पातळीवर पोचले आहे. सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांतून मनुष्य जीवनाला नवी दिशा मिळेल हे आता पुष्कळांना पटू लागले आहे, पण त्याचे प्रमाण अद्यापि तोकडे आहे. कारण अहितकर ठरलेल्या तथाकथित प्रगतीने आपले सारे जीवन व्यापून गेले आहे. तीच गोष्ट अधोरेखित करणारे काही वृत्तांत आणि सर्वेक्षणे प्रगट होऊ लागली आहेत; त्यांवरून भारतीय समाज धोक्याच्या पातळीकडे किती वेगाने चालला आहे त्याची जाणीव होते. 

'पुढारी' दैनिकाच्या ४ नोव्हेंबर २०१९च्या अंकात पहिल्याच पानावर असे वृत्त आहे की, “२०१७ ते २०१८ या वर्षभराच्या काळात, ज्याला 'कॉमन कॅन्सर' म्हणून ओळखतात त्या, तोंडाचा (ओरल) कॅन्सर, स्तनांचा (ब्रेस्ट) कॅन्सर, मानेचा (सर्वाइकल) कॅन्सर या प्रकारच्या रुग्णसंख्येत तब्बल ३२४ टक्क्यांची वाढ झाली. नॅशनल हेल्थ प्रोफाइल २०१९ मधील माहितीनुसार ही आकडेवारी अनेक राज्यांतील नॉन कम्युनल डिसीज् (एनसीडी) क्लिनिक्समध्ये नोंदविण्यात आली आहे. या क्लिनिक्समध्ये सुमारे ६.५कोटि लोक तपासणीसाठी आले, त्यांपैकी १.६ लाख (सुमारे दर हजारात २) जणांना कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. त्या वर्षी कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण गुजरातेत आढळले; त्यानंतर कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगण, प. बंगाल यांचा क्रमांक लागतो." 


या साऱ्या रोगराईचे मुख्य कारण हवा-अन्न-पाणी हेच तर आहे. या तीन गोष्टी आपण बाहेरून आपल्या शरीरात घेत असतो, म्हणजेच हे रोग आपल्या शरीरात जाण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत, तोंड आणि नाक. शेतकऱ्यांनी वापरलेली रासायनिक खते आणि औषधे यांमुळे अन्न व पाण्याचे प्रदूषण होत असते; तर फवारणी करताना कीटकनाशकांमधील अंश हवेत मिसळतो, तो नाकावाटे आपल्या शरीरात जातो. राजधानी दिल्लीच्या मंडईतून भेंडी, पालक, कोबी वगैरे भाज्यांचे १३५ नमुने घेऊन त्यांचे पृथःकरण करण्यात आले. बनारस हिंदू विश्वविद्यालय, दिल्ली विश्वविद्यालय, टॉक्सिक लिंक डेव्हलपमेंट ट्रॅक्स, भारतीय कृषी अनुसंधान व इंपीरियल कॉलेज ऑफ लंडन यांचा संयुक्त अभ्यासगट त्या कामात होता. त्या नमुन्यांतील बहुतांश भाज्यांमध्ये शिसे (लेड), जस्त (झिंक), कॅडमियम (सीडी), यांसारखे धातू प्रमाणापेक्षा खूपच जास्त असल्याचे आढळले. ९५ (७०टक्के) नमुन्यांमध्ये शिसे (लेड) फारच जास्त प्रमाणांत मिळाले, तर पालकाच्या २५ टक्के नमुन्यांत शिसे दुप्पट प्रमाणावर होते. 

अशा प्रकारची अनेक शास्त्रीय सर्वेक्षणे अभ्यासली तर असे म्हणता येते की, भारतातील साधारणतः प्रत्येक माणूस दिवसाकाठी ०.२७ मिलीग्रॅम कीटकनाशक सेवन करतो.


डीडीटी, बीएच्सी, एंड्रिन, मॅलेथिऑन, पॅराथिऑन, मेथाक्सिक्लोअर अशी शेकड्यांनी कीटकनाशके शेतकरी वापरत असतात. त्यांमुळे अन्नधान्य, फळे, भाज्या, दूध, मांस-मासळी, या सर्व अन्नघटकांवर आणि हवा-पाण्यावरही दुष्परिणाम होत आहे. हे परिणाम अर्थातच माणसांइतकेच पशू-पक्षी व साऱ्या जीवसृष्टीवर होत आहेत. यांतून जे रोग हल्ली पुष्कळदा ऐकू येत असतात त्यांत कॅन्सर, रक्तदाब (ब्लडप्रेशर), हृदयविकार (हार्ट ट्रबल), वंध्यत्व, प्रसूतीमधील दोष, नाडीचे अनियमित ठोके, वेडसरपणा वगैरे मानसिक आजार यांचे वाढते प्रमाण आहे. मधुमेही रुग्णांवर कीडनाशकांचा परिणाम लवकर होतो. 'ऑर्गेनो फॉस्फरस' गटातील सर्व कीडनाशका (कार्बारिल) मुळे मानसिक अस्वस्थता, चक्कर, हृदयविकार, यांचे प्रमाण वाढते. डायएट्रिन हे तर शरीरात शिरले की डीडीटीच्या ४०पट प्रभाव दाखविते; कोंबड्यांवर त्याचा प्रभाव ६०पट दिसतो. क्लोरिनेटेड (डीडीटी, बीएच्सी, डायएट्रिन), ऑर्गनो फॉस्फेट (पॅराथिऑन, मॅलेथिऑन), आणि कार्बारिल, कार्बोफ्युरॉन, एलिङ्कार्स ही औषधे जीवघेणी आहेत. 


एकीकडे हरितक्रांती, भरपूर उत्पादन असे नारे देऊन शेतीच्या मार्गाने भरपूर रासायनिक खते शेतांत आली; त्याचबरोबर भरपूर किडी व त्यांना रोखण्यासाठी म्हणून भरपूर कीटकनाशके आली. शेतीमध्ये आधुनिकता आणण्यासाठी म्हणून आपण त्या चक्रव्यूहात शिरलो. त्या मार्गावर प्रयत्न करून थोडेफार यश काही काळ मिळत गेले, परंतु त्या चक्रव्यूहातून वेळीच बाहेर पडण्याऐवजी त्यात खोलवर फसत गेलो. आपल्या शेतकऱ्यांनी प्रयत्नपूर्वक काही पराक्रम केलेसुद्धा, पण रसायनांच्या भडिमारांनी मानवी जीवनावर केलेले आघात आता शेतकऱ्यांनाच नव्हे तर सामान्य जनांसही सोसण्यापलीकडचे होऊ लागले आहेत. शतकांनुशतकांत भारताच्या शेतीमध्ये विकसित झालेले तंत्र, सेंद्रिय शेतीमध्ये झालेले संशेधन हे नव्या रासायनिक शेतीने पार बाजूला फेकले. अलीकडे विविध रोगांची मानवी शरीरांवर होणारी आक्रमणे पाहिली की, उत्पादनवाढीच्या मागे लागून त्या चक्रव्यूहात आपण बरेच काही गमावून बसलो आहोत याची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. 

कमळाचे फूल मिळविण्यासाठी तळ्यात उतरणाऱ्या हत्तीचा पाय पाण्याखालच्या जंजाळ्यात अडकावा तशी आता आपल्या भारतीय शेतकऱ्यांची स्थिती झाली आहे. त्यातून सुटका करून घेऊन सेंद्रिय शेती करणे, रसायन व विषरहित अन्न पिकविणे व त्याचे सेवन करणे हीच आजच्या काळाची गरज आहे. सेंद्रिय शेतीची चळवळ गेल्या काही वर्षांत पुन्हा पसरू लागली आहे. सेंद्रिय खते, वनस्पतीजन्य सेंद्रिय औषधी, जैविक कीड नियंत्रण, कामगंध सापळे, अनेक गव्य (गायीपासूनचे) पदार्थ यांचा उपयोग करून उत्पादनांत वाढ करता येते हे तर सिद्ध झालेलेच आहे. म्हणूनच साऱ्या शेतकऱ्यांनी रासायनिक शेती पद्धतीला पूर्णतः सोडचिठी देऊन जैविक (सेंद्रिय) शेतीशी चिरंतन हिताची सोयरिक करण्याची गरज आहे. त्यामुळेच साऱ्या जीवसृष्टीवर घोंघावणारा धोका टाळता येईल. 

 

Back to blog