पूर्वीच्या काळी आपल्याकडे जलसाठे एकमेकांना जोडण्याची पद्धत होती. छोटे तलाव - ओहोळ किंवा गावाच्या बाहेर असलेले साठे हे वरच्या पाटाने किंवा भूमिगत मार्गाने एकमेकाला जोडलेले असत. शिवाजीमहाराजांच्या किंवा पेशव्यांच्या काळातसुद्धा कात्रजच्या डोंगरातील पाणी, पुणे शहरात आणून साठवण्याची योजना केलेली होती.
अनेक गावांत एकमेकाला जलसाठे जोडण्याच्या अशा योजना होत्या. उदयपूर हे तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे कोल्हापूरचा रंकाळा हा सभोवतीचे अनेक जलसाठे एकत्र जोडणारा मोठा तलाव होता, आहे. मिरज शहरालगत असलेला गणेश तलाव हासुद्धा पूर्व भागातील काही जलसाठे जोडणारा होता. थोडक्यात असे की, नाले ओढे ओहोळ विहिरी तलाव हे सर्व जलस्रोत जवळपासच्या टप्प्यावर तरी एकमेकाला जोडून पाणीपुरवठ्याच्या योजना तयार केल्या जात असत, राबविल्याही जात असत. आणि त्या खानापूर तालुक्यामध्ये येरळा प्रोजेक्ट सोसायटी १९ गावांमध्ये काम करते, त्यांच्या कार्यक्षेत्रात मुख्यतः वांगी कमळापूर या भागामध्ये मोठा ओढा आहे. त्यावरती अंतरा अंतरावर छोटे बंधारे बांधून जलसाठे समृद्ध करण्याचा प्रयोग यशस्वी केला होता. गावातल्या आणि जवळपासच्या शेतकऱ्यांच्या शेतीवाडीमध्ये निघणारा दगड त्यासाठी वापरण्यात आला. स्थानिक लोकांनीच ते बंधारे बांधण्यासाठी मजुरीचे काम केले. त्यातून छोटे छोटे ३६ बंधारे एकाच ओढ्यावर बांधले गेले. संपूर्ण ओढ्याचा जलमार्ग जिवंत राहिला. त्यामुळे त्याकाठच्या विहिरींनाही चांगले पाणी टिकून राहू लागले. पावसाळ्यानंतर एक दोन महिन्यांतच पाण्याची टंचाई व्हायची; त्याऐवजी सहा-आठ महिने पुरेल इतपत पाणी विहिरींमध्ये साठू लागले. स्वाभाविकच तिथल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू लागला.
अलीकडच्या काळामध्ये नदी जोड प्रकल्प हा देशस्तरावरती खूप चर्चेत राहिला. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणीऐवजी तो केवळ चर्चेतच राहिला. १९७२ मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री के एल राव या महान इंजिनियरने या प्रकल्पाची कल्पना मांडून त्याचा आराखडाही तयार केला होता. पुढच्या काळात हा प्रकल्प बस्त्यात बांधून पडला. पुढे वाजपेयी सरकार आल्यानंतर १९९९ मध्ये, देशांतर्गत पाण्याच्या नियोजनासाठी हा प्रकल्प पुन्हा अभ्यासात आला; पण ते सरकारही फार काळ टिकले नाही. मग हा प्रकल्प कुठे गडप झाला ते समजलेच नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर नितीन गडकरी यांच्याकडे काही काळ जलशक्ती हे खाते आले; आणि काही प्रमाणात हे काम सुरू झाले.
ही योजना महत्त्वाकांक्षी म्हणता येईल अशी आहे. देशभरातल्या ३७नद्या ३० ठिकाणी एकमेकीला जोडण्याची ही योजना आहे. त्यासाठी तीन हजार ठिकाणी जलाशय बांधावे लागतील आणि १४९० किमी इतक्या लांबीचे कालवे तयार करावे लागतील. पण हा अवाढव्य प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देशातली ३३% म्हणजे साडेतीन कोटी हेक्टर इतकी जमीन सिंचनाखाली येणार आहे. अर्थातच देशातील सिंचनक्षेत्र १७.५ कोटी हेक्टर इतके होईल. दुष्काळी भागांना पाणी मिळू शकेल. पिण्याच्या पाण्याची चिंताही बऱ्यापैकी दूर होईल. पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते, ते थांबेल. शिवाय जलविद्युत प्रकल्प सुरू होऊ शकतील आणि सुमारे ३४ हजार मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होऊ शकेल.
महाराष्ट्रापुरता विचार केला तर या प्रकल्पामुळे नर्मदा नदीचे पाणी क्षिप्रा नदीच्या मार्फत मिळणार आहे. दर मिनिटाला १.२० लाख लिटर या गतीने त्याचा विसर्ग महाराष्ट्रासाठी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र गुजरात सीमेवर वाहणाऱ्या दमणगंगेचे पाणी गोदावरी नदीत येईल. अर्थातच नाशिक, नगर आणि मराठवाडा या क्षेत्रातील पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी होईल. नीरा-भीमा या नद्याही जोडल्या जाणार असल्यामुळे उजनी धरणापर्यंत हे पाणी जाईल. नीरेचे पाणी भीमा नदीत आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात फिरेल. वैनगंगा नळगंगा योजने अंतर्गत गोदावरी वैनगंगेतील जास्तीचे पाणी ४२५ किलोमीटर अंतरावर पश्चिम विदर्भात तापी पूर्णा या खोऱ्यात नेण्यात येईल. त्यामुळे पश्चिम विदर्भातील सततच्या पाणीटंचाईवरही उपाय सापडेल. हे सर्व गणित आत्ता मांडणे ठीक आहे, पण प्रत्यक्षात या किंवा कुठल्याही योजनेच्या मार्गात अनेक बोके आडवे जात असतात. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याची चिंताच आहे.
या उदाहरणावरून आपल्याला इतकेच समजून घेतले पाहिजे की, आपापल्या शेतामधल्या किंवा शेतीच्या सीमेवरच्या ज्या जलस्रोतांमध्ये अल्पकाळ पाणी येत असते, ते बंधारे घालून अडवावे किंवा असे छोटे ओहोळ ओढे-नाले आणि विहिरी एकमेकाला जोडण्याचा विचार व्हावा. साध्या पाटानेसुद्धा मोठे ओहोळ एकमेकाला जोडता येतील. काही विहिरींसाठीसुद्धा हा प्रयोग करता येईल.
माहितीचे एक उदाहरण असे की, आपल्या भागातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या कडेला पुष्कळ विहिरी पूर्वीपासून आहेत. या विहिरी एकेकाळच्या कोळशाच्या इंजिनांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून रेल्वे खात्यानेच काढलेल्या आहेत. आज अशा अनेक विहिरी निरुपयोगी म्हणून पडून राहिलेल्या आहेत, पण त्या उत्तम स्थितीत आहेत. रेल्वेच्या कडेने ज्यांची शेते आणि विहिरी आहेत, त्यांना या विहिरींचा उपयोग करून दिला पाहिजे. तो देण्यासाठी रेल्वेकडे शेतकऱ्यांनी परवानगी मागितली तर ती सहज मिळू शकत नाही. आणि शेतकरीही त्या स्तरावर पोचू शकत नाहीत. थोडक्यात म्हणजे ही मागणी अनिर्णित आणि अनिश्चित राहते. काही शेतकऱ्यांनी आपल्या हद्दीतल्या किंवा शेतीतल्या विहिरींना आडवे बोगदे किंवा आडवी पहार मारून रेल्वेच्या हद्दीतील चांगल्या विहिरी आपल्या विहिरीला जमिनीच्या खालून जोडल्या आहेत. त्यामुळे त्या दोन्ही विहिरींचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ लागले आहे. वास्तविक या गोष्टीला रेल्वे खात्याने सहजावरी संमती द्यायला हवी होती. स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झाली तरीही असे सोपे साधे विषय अनिर्णित राहून जातात.
मुख्यतः शेतीचा प्रश्न हा पाणी नसल्यामुळेच जास्त गंभीर बनतो. पाणी मिळाले तर भारतीय शेतकरी प्रयत्नपूर्वक शेती विकसित करू शकतो. म्हणून जिथे कुठे पाण्याचा थेंब पडेल तो सर्व साठवून जिरवून मुरवून उपयोगात आणला पाहिजे. त्या दृष्टीने हा पावसाळा शेतकऱ्यांना लाभकारी व्हावा, आणि यापुढच्या काळात अशा गोष्टींना तातडीने मंजुरी व संमती मिळून परस्पर सहकार्यातून पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना सोडविता यावा, अशी अपेक्षा आहे.
आघाडा
श्रावण महिन्यामध्ये नित्य पूजेत आघाडा वापरला जातो. त्याचे औषधी उपयोगही आहेत.
स्त्रियांच्या, पुरुषांच्या, मुलांच्यासुद्धा हातापायांना अनेक वेळा सूज येते, सूज तटतटते, वारंवार सुजेस खाज सुटते, थोडी विश्रांती घेतली असता कमी होते, व जरा काम पडले की पुन्हा सूज येते. अशा वेळी २ ते ४ चिमूट आघाड्याची राख, त्यामध्ये गोमूत्र १० ग्रॅम मिसळावे. व ते मिश्रण पोटात घ्यावे. नियमित घेतले असता सूज कमी होते व आराम वाटतो.
उंदीर चावला असता बऱ्याच दिवसांनी अंगावर गाठी येण्यास सुरुवात होते, ज्वर येतो. अशा वेळी आघाड्याचे कोवळे पांढरे तुरे आणून ते तुरे बारीक वाटावेत. त्यामध्ये मध मिसळून घ्यावा अगर आघाड्याचे बी बारीक कुटून त्यामध्ये मध मिसळून घ्यावा. आघाडा हा व्रण-रोपण करणारा आहे. पुष्कळ वेळा दुष्ट व्रण कोणत्याही उपचारांनी बरेच होत नाहीत. अशा वेळी आघाड्याच्या पानांचा रस व त्याच्या निम्मे तिळाचे तेल घेऊन ते विस्तवावर ठेवून रस आटवावा व तेल शुद्ध करावे. दिवसातून २-३ वेळा त्या तेलाची पट्टी व्रणावर ठेवावी. व्रण बरा होतो. (उपचारापूर्वी वैद्यकीय सल्ला आवश्यक).