आर्य चाणक्याचा काळ सुमारे तेवीसशे वर्षांपूर्वीचा आहे. त्याने राज्यकारभाराच्या आणि अर्थशास्त्राच्या बाबतीत जी निरीक्षणे, जे नियम आणि संकेत घालून दिलेले आहेत, त्याचे महत्त्व आजही नाकारता येत नाही. राजाने जनतेकडून कर (टॅक्स) कसा गोळा करावा याची पद्धत सांगताना तो म्हणतो, "मधमाशी फुलांतून मध जसा गोळा करते, तशी करपद्धती असावी. फुलाला त्रास होऊ नये, मध तर मिळावा आणि नंतर तो माणसाच्या आरोग्यासाठी उपयोगात यावा. शिवाय निसर्गाच्या संवर्धनासाठी सहजगत्या परागीभवन होऊन ही सृष्टी फळाफुलांनी संपन्न व्हावी." आजच्या आपल्या शेतीशास्त्राच्या दृष्टीने, चाणक्याने केलेली मधमाशीविषयीची निरीक्षणे कशी महत्त्वाची आहेत ते कळते.
मधमाशांमुळे परागीभवन फार चांगल्या पद्धतीने होते. शेतीमधली अन्नसाखळी अक्षुण्ण, अविरत राखण्याचे काम मधमाशी करते. म्हणून तर मधमाशांचे रक्षण, संगोपन, संवर्धन करायचे असते, हे आता आवर्जून सांगण्याची वेळ आलेली आहे. सेंद्रिय शेतीच्या संदर्भात मधमाश्यांच्या संगोपनाचे काम महत्त्वाचे आहे. जगालाही ते आता पटले आहे. म्हणून तर २० मे हा दिवस 'मधमाशी दिन' मानला जातो. त्या निमित्ताने या विषयाकडे लक्ष वेधले जावे, असा त्यात हेतू असतो.
गेल्या २० मे रोजी, म्हणजे 'मधमाशी दिना'स, त्या विषयातील तज्ज्ञ मंडळींनी इशारा दिला आहे की, रासायनिक शेतीचा अवलंब करताना वापरल्या जाणाऱ्या कीडनाशकांमुळे मधमाशा व त्यांची पोळी नष्ट होत आहेत, हे चांगले नव्हे!!
भारतामधील भाजीपाला उत्पादक संघटनेचे तज्ज्ञ सल्लागार डॉ. संतोष सहाणे हे कोइमतूर येथील 'तामिळनाडू अॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी' मधील कीटकशास्त्रातील एक संशोधक आहेत. त्यांनी इशारा दिला आहे की, परागीभवन होत असताना कीडनाशकांतील रसायने मधमाश्यांच्या शरीरावर चिकटतात आणि ती मधमाश्यांच्या पोळ्यापर्यंत येतात. माश्यांची अंडी आणि नवजात माशा नष्ट होतात. शिवाय, पोळ्यातील राणीमाशी आणि इतर लहान माश्यांच्या मेंदूची स्मरणशक्ती त्या रसायनांमुळे कमकुवत होते. साहजिकच त्यांच्या संवेदना व त्यावर आधारलेले, मधाच्या फुलांपर्यंत नेणारे त्यांचे कामच थांबते. आपले उद्दिष्ट त्या विसरून जातात.
पीक मोहरण्याच्या सुमारास शेतकरी आपल्या शेतात रासायनिक औषधांची फवारणी करतात – विशेषतः निओनिकोटिनॉइड यांचा वापर केला जातो. यांपैकी इमिडाक्लोप्रिड व थायमेथॉक्सॅम या औषधांचा परिणाम मधमाश्यांवर फार घातक होतो. त्यांना योग्य वास न येणे, फुलांकडे जाण्याचा मार्ग चुकणे, मधाचा संग्रह करण्यात अडचण येणे आणि स्वाभाविकच परागकणांचे वहन नीट न होणे, असे घडू लागते. म्हणजेच त्यांच्या कामावर दुष्परिणाम होतो. यातूनच पुढे मधमाशा व त्यांची पोळी नाहीशी होऊ लागतात. या अंकात त्या विषयावर विशेष लेख दिला आहे.
जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने या विषयाचे गांभीर्य शेतकऱ्यांच्या लक्षात आणून द्यायला हवे. जगातील वनस्पतींपैकी ३.६९ लाख वनस्पती फुले येणाऱ्या आहेत. त्यांपैकी ९० टक्के वनस्पती मधमाशी किंवा कीटकांकडून परागीभवन होण्यावर अवलंबून असतात. एक मधमाशी एका फेरीत सुमारे एक हजार फुलांना भेटते. साधारण दिवसभरात तिने दहा फेऱ्या मारल्या, तर ती १० हजार फुलांशी जाते. एका पोळ्यात साधारण २५ हजार माशा असतात, असे धरले तर दररोज सुमारे २५ कोटी फुलांचे परागीभवन घडते. या प्रमाणांत फलनिर्मिती – म्हणजेच अन्ननिर्मिती होते. विकसित देशांतील सुमारे ३० टक्के अन्ननिर्मिती ही मधमाश्यांकडून होणाऱ्या परागीभवनावर अवलंबून असते. एकूणच जगभरातील अन्नउत्पादन हे मधमाशा आणि कीटकांद्वारे होणाऱ्या परागीभवनावरच अवलंबून असते, हे आता ध्यानात आलेले आहे.
सूर्यफूलाचे उत्पादन जे शेतकरी घेतात, ते आपल्या हातात सुती फडके घेऊन उमलत्या फुलांस स्पर्श करतात. त्यामुळे परागीभवन होण्यास मदत होते आणि उत्पादन जास्त होते, हा त्यांचा अनुभव आहे. हल्ली कृषितज्ज्ञही तसा सल्ला देतात. याला तर 'अव्यापारेषु व्यापार' म्हणतात. तो करण्याची गरज नाही; कारण फुलपाखरे व मधमाशा तर निसर्गतःच हे काम अधिक वेगाने करतात.
परंतु त्यासाठी मधमाश्यांचे संगोपन व त्यांचे रासायनिक प्रादुर्भाव व कीडनाशकांपासून संरक्षण करायला हवे. कीडनियंत्रणासाठी सेंद्रिय, वनस्पतीजन्य कीडनाशक उपायांचा अवलंब केला पाहिजे.
हल्ली विशेषतः शहरी भागांत वापरले जाणारे चहाचे कागदी कप, रुग्णालयांतील कचरा या गोष्टीही मधमाश्यांसाठी मृत्यूचे सापळे ठरू लागले आहेत. त्यांतील वासाकडे मधमाशा आकर्षित होतात, तिथेच घुटमळतात, नैसर्गिक फुलांकडे जाण्याचेच विसरतात. त्याच कचऱ्यात पडून मरतात. तामिळनाडू कृषिविद्यापीठाच्या संशोधनांतून हेही लक्षात आले आहे. याशिवाय आपल्या आजच्या जीवनातील इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी, सेलफोनच्या लहरी, यांमुळेही मधमाशा व उपयुक्त कीटकांचा संचार अडचणीत येतो. परिणामतः मधमाशांची पोळी कमकुवत होत चालली आहेत.
सेंद्रिय विचार करताना प्रत्येकाने, विशेषतः शेतकऱ्यांनी सावध होऊन निसर्गाने ज्या व्यवस्था दिल्या आहेत, त्यांचा नीट अभ्यास करण्याची सवय करायला हवी. आपल्या शेतीजीवनासाठी सगळ्याच गोष्टी उपयुक्त दिलेल्या आहेत म्हणूनच निसर्गाचा समतोल बिघडू देता कामा नये. त्यांचे जतन आणि संवर्धन करून आपली निसर्गदत्त शेती सुधारणे म्हणजेच आपल्या शेतीची प्रगती करणे हे समजून घ्यावे.
'सेंद्रिय विचार' चा मी नियमित वाचक आहे. या माध्यमातून नेचर केअर फर्टिलायझर्सकडून शेतकऱ्यांचे प्रबोधन उत्कृष्ट तऱ्हेने केले जात आहे. मे २०१९ च्या अंकातील कै. श्री. अ. दाभोलकरांविषयी लेख उत्कृष्ट आहेत. 'ऋषितुल्य कृषक' असणाऱ्या गणिततज्ज्ञाचे हे स्मरण अती उत्कृष्ट आहे.
– श्री. वैभव मोडक, मंगळवेढा (जि. सोलापूर)
आपला मे महिन्याचा व जून महिन्याचा असे दोन्ही अंक अत्यंत उत्तम आहेत. कोकणातल्या 'फणसाचा डोंगर' या लेखामुळे सर्व कृषिजगताला या उपक्रमाची माहिती झाली. जवळ असूनही माहिती नसते, ते सर्व आपल्या प्रकाशनातून शेतकऱ्यांना सुलभपणे मिळत आहे. धन्यवाद.
– श्री. विठ्ठल खांडेपारकर, पिराला (गोवा)
जून २०१९ च्या 'सेंद्रिय विचार' अंकामधील संपादकीय सर्वच शेतकऱ्यांना पाणी वापराविषयी विचार, चिंतन व आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. वृक्षारोपण करून ती झाडे जगवण्याची, वाढवण्याची मोहीम सर्वदूर हाती घेतली पाहिजे, ही जाणीव होत आहे. झाडे लावताना मारुती चितमपल्ली यांच्या लेखाचा अभ्यास शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे, हे जाणवले.
– श्री. श्रीप्रकाश जोशी, अरंडवणा, पुणे
या अंकाला ओघवती, उत्कृष्ट पसंती मिळत असते, त्यांचा उल्लेख करणे आनंदाचे असते. यापुढे त्यांची नोंद घेतली जाईल. वाचकांकडून अंकातील मजकुराविषयी प्रतिक्रिया, प्रश्न-शंका, सूचना यांचे स्वागत आहे. आपले अनुभव लिहून पाठवावेत. हा अंक सर्वांनी सर्वांसाठी चालवायचा आहे.